नवरात्रोत्सवासाठी बाजारपेठांना चढला रंग; देवीच्या मूर्तींचे रविवारी मंडपांमध्ये होणार आगमन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 09:53 AM2024-09-25T09:53:14+5:302024-09-25T09:54:47+5:30
श्रीगणेशाची मनोभावे सेवा केल्यानंतर आता मुंबापुरी अंबामातेच्या आगमनासाठी सज्ज झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : श्रीगणेशाची मनोभावे सेवा केल्यानंतर आता मुंबापुरी अंबामातेच्या आगमनासाठी सज्ज झाली आहे. बहुतांशी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या अंतिम बैठका पार पडल्या असून, बैठकांत मंडळांनी जमा-खर्चाचा आढावा घेतला आहे. दुसरीकडे नवरात्रोत्सवानिमित्त बाजारपेठा सजू लागल्या असून, घटस्थापनेसाठी लागणाऱ्या साहित्यापासून गरब्यासाठी लागणाऱ्या चुनरी, चनिया-चोलीसारख्या आवडीचे कपडे खरेदी करण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे. या साहित्याच्या किमतीमध्ये फार मोठी वाढ झाली नसली, तर बाजाराचा ट्रेंड सांभाळण्यासाठी ग्राहकांसह मंडळांना काहीशी आर्थिक झळ सोसावी लागत असल्याचे सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांकडून सांगण्यात आले.
मुंबई शहर आणि उपनगरातील बहुतांशी मंडळांच्या मूर्तींच्या आगमन मिरवणुका रविवारी होणार असल्याने, त्या दृष्टीने सार्वजनिक मंडळांच्या परांची उभ्या राहिल्या आहेत. त्यावर राजकीय पक्षांची नावे आणि नेत्यांचे फोटो झळकविण्याच्या दृष्टीने मंडळांची तयारी सध्या सुरू आहे.
बाजारात ट्रेंड काय?
१) गेल्या वर्षी लायटिंग, गेट, स्टेजसह डेकोरेशनसाठी मंडळाला ७० हजार मोजावे लागले होते. मात्र, या वर्षी हा खर्च किमान ८० हजारांवर गेला आहे.
२) लालबाग, कुर्ल्यासह विविध भागांतील कापूर, अगरबत्तीच्या मार्केटमध्ये पूजेच्या साहित्याचे दर अद्याप स्थिर असल्याचे चित्र आहे.
३) देवीला वाहण्यासाठी यंदा लाल, गुलाबी, पिवळ्या, हिरव्या रंगाच्या चुनरी बाजारात आल्या असून, त्यावरील सोनेरी चमक्यांचे नक्षीकाम ग्राहकांना आकर्षित करत आहे.
४) झवेरी बाजार, मालाडमधील अलंकाराच्या मार्केटमध्ये देवीसाठीचे मंगळसूत्र, बांगड्या, कर्णफुले यांची मागणी सध्या प्राथमिक स्तरावर असून, शनिवार आणि रविवारी ती अधिक वाढण्याचे संकेत आहेत.
पुढचा आठवडा महत्त्वाचा-
१) रविवारी मोठ्या देवीच्या मूर्ती मंडपाकडे रवाना होतील.
२) छोट्या मूर्ती २ ऑक्टोबर रोजी मंडपाकडे रवाना होतील.
३) रविवारपासून दसऱ्यापर्यंत गोंड्याची आवक वाढून त्याचे भाव चढे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सोन्याचा भाव आता ७४ हजार रुपये तोळा आहे. पुढील आठवड्यात हाच भाव कायम राहणार असला, तरी दसऱ्याच्या दरम्यान तो प्रतितोळा ७५ हजारांवर जाण्याची शक्यता आहे. आता देवीसाठी चांदीचा हात, मंगळसूत्र, पैंजण आणि मुकुट बनविण्यासाठीची मागणी होत आहे. - निर्भय सिंग, सुवर्ण विक्रेते.
डीजे मार्केट आणि पन्नास हजार रुपये-
गरबा, इतर सोहळ्यासाठी लागणारे डिस्को जॉकी, बेंजो, नाशिक ढोल, लेझीम पथक आदींची बुकिंग यंदाही फुल्ल झाली आहे. सध्या डीजेसाठी किमान पन्नास हजारांची बिदागी दिली जात असून, परिसरानुसार ते दर वाढत असल्याचे सांगण्यात आले.