माटुंगा, वडाळ्याला मुबलक पाणी; अमर महल ते वडाळा जलबोगद्याचा ब्रेक थ्रू यशस्वी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 10:02 AM2024-06-22T10:02:32+5:302024-06-22T10:04:58+5:30

अमर महल ते वडाळा व पुढे परळपर्यंतच्या ९.७ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचे खोदकाम ‘टीबीएम’ यंत्राद्वारे पूर्ण झाले आहे.

in mumbai matunga abundant water to wadala break through of amar mahal to wadala 9.7 km water tunnel successful  | माटुंगा, वडाळ्याला मुबलक पाणी; अमर महल ते वडाळा जलबोगद्याचा ब्रेक थ्रू यशस्वी 

माटुंगा, वडाळ्याला मुबलक पाणी; अमर महल ते वडाळा जलबोगद्याचा ब्रेक थ्रू यशस्वी 

मुंबई : अमर महल ते वडाळा व पुढे परळपर्यंतच्या ९.७ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचे खोदकाम ‘टीबीएम’ यंत्राद्वारे पूर्ण झाले आहे. या भूमिगत जलबोगदा प्रकल्पांर्तगत वडाळा ते परळदरम्यान ५.२५ किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याच्या जलबोगद्याचा ‘ब्रेक थ्रू’ शुक्रवारी मुंबई महापलिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते करण्यात आला. 

या बोगद्याद्वारे ‘एफ उत्तर’ विभागातील माटुंगा, वडाळा परिसर, ‘एफ दक्षिण’मधील परळ, ‘ई’ विभागातील भायखळा आणि ‘एल’ विभागातील कुर्ला भागांमध्ये पुरेसा व उच्च दाबाने पाणीपुरवठा करणे पालिकेला शक्य होणार आहे. त्यामुळे जलबोगदा प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा या निमित्ताने पार पडला आहे.जलबोगद्याचे खोदकाम पूर्ण झाल्यामुळे पालिकेच्या यादीत आणखी एक महत्त्वाच्या प्रकल्पाची भर पडली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरानंतर १०० किलोमीटर जलबोगदे असणारे मुंबई महानगर जगातील दुसरे शहर ठरले आहे. हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी कोविडच्या कालावधीतही प्रकल्पाचे खोदकाम अविरतपणे सुरू होते. 

अनेक आव्हानांवर केली मात -

खोदकामादरम्यान मोठ्या प्रमाणावर आढळलेले भूजल पाझर, वारंवार बदलणारे भूगर्भीय स्तर तसेच बोगद्यात खडक ढासळणे अशा प्रकारच्या आव्हानांचा मुकाबला करत पालिकेने दुसऱ्या टप्प्याचे खोदकाम नियोजित वेळेत पूर्ण केले आहे. संपूर्ण प्रकल्पाचे ७४ टक्के काम पूर्ण झाले असून, हा प्रकल्प एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होईल, असे नियोजन पालिकेने केले आहे.

जगभरातील योजनांमध्ये मुंबई-

१) जगभरातील सर्वांत मोठ्या पाणीपुरवठा योजनांमध्ये मुंबईची पाणीपुरवठा व्यवस्था गणली जाते. पाण्याच्या वहनासाठी जलबोगदे बांधणारी मुंबई महापालिका भारतातील पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्था असल्याचे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले.

२) जलवितरण व्यवस्थेतील व्यवहार्य पर्याय म्हणून जलबोगद्यांचा वापर केला जात असून, त्यांद्वारे पाणी वाहून आणल्याने गळती व पाणीचोरीला आळा बसत आहे. एकूण ९० किलोमीटर लांबीच्या काँक्रीटच्या जलबोगद्यातून दररोज पाणी आणले जात असून, त्यात आता अमर महल ते वडाळा व पुढे परळपर्यंतच्या ९.७ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याची भर पडली आहे. 

प्रकल्पाची वैशिष्ट्ये -

१) जलबोगद्याद्वारे एफ उत्तर, एफ दक्षिण, अंशतः ई आणि एल विभागातील काही परिसराला २०६१ सालापर्यंत पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.
जलबोगदा सुमारे १०० ते ११० मीटर इतक्या खोलीवर असून बोगद्याचे खोदकाम व्यास ३.२ मीटर आणि अंतर्गत काँक्रीटचे अस्तरीकरण झाल्यावर व्यास २.५ मीटर इतके असणार आहे.

२) या प्रकल्पांतर्गत तीन कूपकांचे (शॉफ्ट्स) बांधकाम अंतर्भूत आहे. हेडगेवार उद्यान येथील १०९ मीटर, प्रतीक्षानगर येथील १०३ मीटर आणि परळ येथील १०१ मीटर खोलीच्या तिन्ही कूपकांचे काम पूर्ण झाले आहे.

नवे विक्रम-

१)  हेडगेवार उद्यान येथील ९६.१५ मीटर खोलीच्या कूपकाच्या प्रबलित काँक्रिटीकरण अस्तरीकरणाचे काम २९ दिवसांत पूर्ण.

२) जानेवारी २०२२ मध्ये एका महिन्यात ६०५ मीटर लांबीच्या जलबोगद्याचे विक्रमी खोदकाम मार्गी.

३) विविध अडचणींना तोंड देत एका दिवसात सर्वोच्च अशा ३४.५ मीटर लांबीच्या जलबोगद्याचे खोदकाम करण्यात यश.

Web Title: in mumbai matunga abundant water to wadala break through of amar mahal to wadala 9.7 km water tunnel successful 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.