साचलेल्या पाण्यातून चालाल तर लेप्टोशी गाठ; १४ हजार संशयित नागरिकांना दिल्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 10:09 AM2024-07-17T10:09:28+5:302024-07-17T10:11:54+5:30

जुलै महिन्यात शहरात दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे याकाळात मोठ्या प्रमाणात डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस (लेप्टो) आदी साथीचे आजार पसरतात.

in mumbai medical expert have appealed that one should not go into stagnant water may develop leptospirosis medicine were given to 14 thousand suspected citizens | साचलेल्या पाण्यातून चालाल तर लेप्टोशी गाठ; १४ हजार संशयित नागरिकांना दिल्या गोळ्या

साचलेल्या पाण्यातून चालाल तर लेप्टोशी गाठ; १४ हजार संशयित नागरिकांना दिल्या गोळ्या

मुंबई :  जुलै महिन्यात शहरात दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे याकाळात मोठ्या प्रमाणात डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस (लेप्टो) आदी साथीचे आजार पसरतात. त्यामुळे अशा आजारांचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जातात. त्यात लेप्टोस्पायरोसिस या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी १५ दिवसांत १४,०५९ संशयित नागरिकांना त्याच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. त्यासोबत  या काळात  महापालिकेने जवळपास १३,२५५ उंदीर मारले आहेत.

दरवर्षी रस्त्यांवर पाणी तुंबू नये, यासाठी महापालिका प्रयत्नशील असते. मात्र, पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने दरवर्षी मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचते. अनेकदा नागरिकांना दुसरा पर्यायी मार्ग नसल्याने ते याच पाण्यातून ये-जा करतात. रस्त्यांवरील बिळांमध्ये पाणी शिरल्याने घुशी, उंदीर बाहेर येतात. त्यांचे मलमूत्र साचलेल्या पाण्यात असते. शरीरावरील विशेषत: पायावर असलेली जखम अशा पाण्याच्या संपर्कात आल्यास लेप्टोस्पायरोसिस होतो. त्यामुळे साचलेल्या पाण्यात शक्यतो जाऊ नये, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. याबाबत महापालिकेकडून मुंबईतील सर्व विभागांमध्ये जनजागृती मोहीम राबिवण्यात येत आहे. 

गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ -

जून महिन्यात गॅस्ट्रोच्या ७२२ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर जुलै महिन्याच्या पंधरवड्यातच ६९४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जुलै महिन्यात गॅस्ट्रोच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

जूनमध्ये होते २८ रुग्ण-

गेल्या संपूर्ण जून महिन्यात लेप्टोस्पायरोसिसचे २८  रुग्ण आढळून आले होते. तर या जुलै पंधरवड्यात  गेल्या महिन्याच्या तुलनेत जवळपास दुपटीने म्हणजेच ५२ रुग्ण सापडले आहेत. या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. जुलै पंधरवड्यात १३,२५५ उंदीर मारले आहेत. 

काय काळजी घ्याल? 

१) पावसाच्या तुंबलेल्या पाण्यातून चालू नये. जर जायचेच असेल, तर गुडघ्यापर्यंत गमबूट घालावेत. जेणेकरून दूषित पाण्याचा संपर्क येणार नाही.

२) पायावर कोणतीही जखम असेल, तर तिच्यावर तत्काळ उपचार करावेत. कारण दूषित पाणी जखमेद्वारे शरीरात जाऊ शकते.

३) सांडपाणी मिसळलेल्या पाण्यातून चालू नये.

४) साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर घरी पूर्ण शरीर स्वच्छ धुऊन घ्यावे.

५) तापासारखी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Web Title: in mumbai medical expert have appealed that one should not go into stagnant water may develop leptospirosis medicine were given to 14 thousand suspected citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.