Join us  

'मध्य रेल्वे'वर मेगाब्लॉकचे रडगाणे सुरूच; प्रवासी त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 10:01 AM

मध्य रेल्वेवर रविवारी घेतलेल्या मेगा ब्लॉकचा फटका कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना चांगलाच बसला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मध्य रेल्वेवर रविवारी घेतलेल्या मेगा ब्लॉकचा फटका कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना चांगलाच बसला. सर्व गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावल्याने प्रवाशांचे नियोजन कोलमडले. 

मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान दोन्ही मार्गिकांवर ब्लॉक घेण्यात आला होता. कल्याण येथून सुटणाऱ्या लोकल कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात आल्या आणि डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे स्थानकांवर त्यांना थांबा देण्यात आला. त्यामुळे सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत कोपर आणि ठाकुर्ली स्थानकावर कोणतीही लोकल गाडी थांबली नाही. परिणामी कोपर आणि ठाकुर्ली या दोन्ही स्थानकांवरील रेल्वे प्रवाशांना ट्रॅक वरून चालत जाऊन पुढचे स्थानक गाठावे लागले. 

'हार्बर'वरही लोकल रद्द-

कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान हार्बर मार्गावरही ब्लॉक घेण्यात आल्यामुळे सकाळी १०:३४ ते दुपारी ४ या कालावधीत सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर, वाशी दोन्ही मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले.

 मध्य रेल्वेवर ब्लॉक नंतर पहिली लोकल सीएसएमटी वरून दुपारी ३:३० वाजता सुटली. तसेच हार्बर मार्गावर ब्लॉकनंतर पहिली पनवेल लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ४ वाजता सुटली.

टॅग्स :मुंबईमध्य रेल्वेहार्बर रेल्वे