मुंबई : मान्सून मजल दरमजल करत मुंबईसह राज्यातील अनेक भाग काबीज करत आहे. मात्र, मान्सून दाखल झाल्याची घोषणा करण्यात आली म्हणजे आता सुरुवातीलाच खूप पाऊस कोसळणार असे घडत नाही, तर हवामानाची अनुकूलता आणि हवामान बदलावर मान्सूनचा जोर कमी-जास्त राहतो, असे स्पष्ट करत मान्सून दाखल झाला म्हणजे नेमके काय, हे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सोपे करून सांगितले.
मान्सून पोहोचला म्हणजे काय तर तो त्याच्या मूळ उगमापासून म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या विषुववृत्ताच्या पूर्व किनारपट्टीवर असणारे पेरू, कोलंबिया, इक्वेडोर या देशांतून समुद्रावरून येणारे मोसमी वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे विषुववृत्ताला समांतर वाहण्यास सुरुवात होते. हे वारे अंदाजे १९ हजार किलोमीटर सागरी अंतर कापून वाहत येतात.
१) हिंद महासागर ओलांडून प्रथम ते दक्षिण आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील केनिया, सोमालिया या देशांजवळ आदळतात.
२) मोसमी वाऱ्यांचा मार्ग मोकळा होणे म्हणजेच मान्सून आपल्या भागात पोहोचणे, असे समजले जाते. आपल्याकडे चार महिने बाष्पयुक्त वारे नैऋतेकडून ईशान्यकडे वाहतात.
तेथील पर्वतीय क्षेत्राच्या अटकावामुळे आणि पृथ्वीच्या भ्रमणातून तयार होणाऱ्या ‘कोरिओलीस’ फोर्समुळे त्यांची दिशा नैर्ऋतेकडून ईशान्येकडे म्हणजे साधारण सोमलियाकडून भारताच्या केरळ राज्याकडे बदलते. अशा प्रकारे बाष्प घेऊन येणाऱ्या मोसमी वाऱ्यांचा प्रचंड प्रवाह, वातावरणीय प्रणालीद्वारे खाली-वर करत पुढे सरकतो आणि भारताकडे येण्याचा त्यांचा मार्ग मोकळा होतो.
यंदा पावसात जोर नसल्यासारखी परिस्थिती उद्भवली तर काळजी करण्याचे कारण नाही. कारण यंदा ‘ला- निना’ आहे. त्यामुळे बाष्प-ऊर्जास्रोताची उपलब्धता भरपूर असेल. मान्सूनच्या प्रवासादरम्यान ऊर्जा कमी झाली तर निसर्ग आपोआप ती भरण्याची व्यवस्था करेल. - माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ
पाऊस आला म्हणतात येथे चक्क ऊन पडले आहे, हा काय प्रकार आहे, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतो. त्याचे उत्तर मोसमी वाऱ्यांना लागणाऱ्या ऊर्जेत आहे.
बाष्प-ऊर्जा पावसाळी हंगामात कमी -
१) बाष्पयुक्त वाऱ्यांत पाऊस कोसळण्यासाठी जबरदस्त ऊर्जा, ताकद असेल किंवा दमदारपणा असेल, तरच पाऊस होतो.
२) ही बाष्प-ऊर्जा पावसाळी हंगामात कमी होते, भरली जाते. ऊर्जा कमी झाली तर फक्त मोसमी बाष्पयुक्त वारेच ही ऊर्जा पुन्हा भरू शकतात. म्हणून मोसमी वारे तुमच्या शहरापर्यंत पोहोचणे गरजेचे असते. कधीकधी असे होते की मान्सून आला किंवा येऊन पुढे गेला तरी पाऊस होत नाही. मग नागरिक, शेतकरी गोंधळतात.