मुंबई : डी. एन. नगर ते दहिसर पूर्व ‘मेट्रो २ अ’ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व ‘मेट्रो ७’ मार्गिकेने दैनंदिन प्रवासी संख्येचा दोन लाख ६० हजारांचा टप्पा पार केला असला तरी अद्याप अपेक्षित प्रवासी संख्येपासून ही मेट्रो दूरच आहे.
या दोन्ही मेट्रो मार्गिकांवरून पहिल्या वर्षी नऊ लाख ३६ हजार प्रवासी प्रवास करतील, असे अपेक्षित होते. मात्र, या मेट्रो सुरू होऊन दोन वर्षे झाल्यानंतरही अपेक्षित प्रवासी संख्येच्या केवळ २८ टक्केच प्रवासी संख्या गाठता आली आहे. त्यातून या मेट्रो प्रकल्पांसाठी अपेक्षित प्रवासी संख्येच्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वर्तविलेल्या अंदाजावरच तज्ज्ञांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
एमएमआरडीएच्या २०२० मधील अंदाजानुसार, ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिका सुरू झाल्यावर पहिल्या वर्षी अनुक्रमे चार लाख सात हजार आणि पाच लाख २९ हजार प्रवासी प्रवास करतील, असे अपेक्षित होते. या दोन्ही मेट्रोमुळे लिंक रोड आणि एस. व्ही. रस्त्यावरील ३० टक्के, तर पश्चिम द्रुतगती मार्गावरील २० ते २५ टक्के वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, ही मेट्रो मार्गिका सुरू होण्यासाठी एप्रिल २०२२ उजाडले. तर, दुसरा टप्पा २०२३ मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला. मात्र, या मेट्रो सुरू होऊन दोन वर्षानंतरही अपेक्षित प्रवासी संख्या गाठता आली नाही.
अहवालातील आकडे फुगवले?
१) आता एमएमआरडीच्या प्रकल्प अहवालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मेट्रो प्रकल्प उभारण्यापूर्वी अपेक्षित प्रवासी संख्येचा अंदाज वर्तविला जातो. मात्र, या दोन मेट्रो मार्गिकांच्या उभारणीवेळी खरे अंदाज दिले असते तर प्रकल्पांसाठी मंजुरी मिळाली नसती.
२) त्यामुळे हे आकडे फुगवून दिल्याची शक्यता आहे. सध्या मेट्रो मार्गिकेच्या खालून धावणाऱ्या बस भरून जात आहेत. मात्र, मेट्रो रिकामी धावते. तिचे भाडेही अधिक आहे. त्यामुळे मेट्रोचा वापर होत नाही, असे मत सामाजिक कार्यकर्ते झोरू बथेना यांनी व्यक्त केली.
प्रवास भाडेही अधिक-
या दोन्ही मेट्रो मार्गिकांना अद्यापही ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ नाही. त्यातून मेट्रोतून उतरून पुढील प्रवासासाठी अडचणी असल्याने प्रवासी उपनगरी रेल्वेचा पर्याय वापरतात.
लोकल, बसच्या तुलनेत मेट्रोचे प्रवासभाडेही अधिक आहे. सर्वसामान्यांना ते परवडणारे नाही. त्यांच्याकडे उपनगरी रेल्वेचा स्वस्त पर्याय उपलब्ध असल्याने महागडी मेट्रो वापरत नाहीत.
मेट्रोचे तिकीट दर कमी केल्यास प्रवासी संख्या वाढेल, असे मुंबई मोबिलिटी फोरमचे ए. व्ही. शेनॉय यांनी नमूद केले.