‘मेट्रो ३’ला सध्या रेड सिग्नलच; आणखी प्रतीक्षा करावी लागणार; ‘सीएमआरएस’ची तपासणी प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 09:48 AM2024-07-31T09:48:38+5:302024-07-31T09:50:22+5:30

कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिका सुरू होण्यासाठी मुंबईकरांना आणखी प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत.

in mumbai metro 3 currently has a red signal more will have to wait cmrs investigation pending | ‘मेट्रो ३’ला सध्या रेड सिग्नलच; आणखी प्रतीक्षा करावी लागणार; ‘सीएमआरएस’ची तपासणी प्रलंबित

‘मेट्रो ३’ला सध्या रेड सिग्नलच; आणखी प्रतीक्षा करावी लागणार; ‘सीएमआरएस’ची तपासणी प्रलंबित

मुंबई : कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिका सुरू होण्यासाठी मुंबईकरांना आणखी प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत. मेट्रो ३च्या आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्यातील मार्गिकेच्या मेट्रो गाड्यांची तपासणी रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) संस्थेमार्फत पूर्ण होऊन महिना उलटला असला तरी अद्याप मेट्रो मार्गिकेसाठी कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (सीएमआरएस) पथक दाखल झालेले नाही. 

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मेट्रो ३ मार्गिकेचे लोकार्पण करण्याच्या अनुषंगाने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून तयारी सुरू आहे. त्यानुसार सीएमआरएस पथकाला मेट्रो मार्गिकेची तपासणी करण्यासाठी जुलै महिन्याच्या मध्यावर पाचारण केले जाणार होते. मात्र, जुलै महिना उलटला तरी अद्याप हे पथक तपासणीसाठी दाखल झाले नसल्याची स्थिती आहे. या पथकाकडून काटेकोर      तपासणीनंतरच मेट्रो मार्गिका सुरू करण्यासाठी परवानगी दिली जाते. तसेच काही त्रुटी असल्यास त्यांची पूर्तता करण्यास सांगितले जाते. दरम्यान, अद्याप सीएमआरएस पथक आले नसल्याने मेट्रो मार्गिकेच्या चाचण्या पूर्ण होऊन मार्गिका सुरू होण्यास विलंब होणार असल्याची स्थिती आहे. 

स्थानकात पाणी शिरल्याचाही फटका-

१)  मेट्रो ३ मार्गिकेच्या तीन तीन स्थानकांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. कंत्राटदाराने मान्सूनच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी न घेतल्याने हा प्रकार घडला. त्यातून नव्याने उभारणी सुरू असलेल्या मेट्रो स्थानकातील मालमत्तेचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. 

२)  स्थानकांमध्ये प्रवेशाची आणि स्थानकातून बाहेर पडण्याच्या मार्गाची कामे कंत्राटदाराने अद्याप पूर्ण केली नसल्याची स्थिती आहे. स्थानकांमधील स्थापत्य कामे, साईन बोर्ड लावणे यासह अनेक कामे अद्यापही अपूर्ण आहेत. परिणामी, याचा फटका मेट्रो मार्गिकेचा पहिला टप्पा सुरू होण्याला बसत आहे. त्यातूनही सीएमआरएस पथकाला पाचारण करण्यात विलंब होत असल्याची चर्चा आहे. 

Web Title: in mumbai metro 3 currently has a red signal more will have to wait cmrs investigation pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.