मेट्रो ५ मार्गिकेचा उल्हासनगरपर्यंत होणार विस्तार; एमएमआरडीएकडून ६ महिन्यांत डीपीआर अंतिम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 11:15 AM2024-07-03T11:15:51+5:302024-07-03T11:17:46+5:30
कल्याण डोंबिवली परिसरातील वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ मार्गिकेचा विस्तार केला जाणार आहे.
मुंबई : कल्याण डोंबिवली परिसरातील वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी ठाणे-भिवंडी-कल्याणमेट्रो ५ मार्गिकेचा विस्तार केला जाणार आहे. त्यानुसार मेट्रो ५ मार्गिकेचा कल्याण येथून दुर्गाडीपर्यंत आणि तेथून पुढे उल्हासनगरपर्यंत ही मेट्रो मार्गिका नेण्याचा विचार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सुरू आहे. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल येत्या सहा महिन्यांत अंतिम केला जाणार आहे. त्यादृष्टीने एमएमआरडीएकडून नियोजन करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत एमएमआरडीएकडून मेट्रो ५ मार्गिकेच्या कापूरबावडी ते धामणकर नाका या पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसात या मेट्रोच्या धामणकर नाका ते कल्याण एपीएमसी या मार्गाचे काम सुरू केले जाणार आहे. दरम्यान कल्याण आणि डोंबिवली परिसराचा झपाट्याने विस्तार होत आहे. त्यामुळे या भागात गर्दी वाढू लागली आहे.
वाहतूककोंडीवर तोडगा निघणार-
कल्याण भागातील अंतर्गत वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी या मेट्रोचा विस्तार करण्याचा विचार एमएमआरडीएकडून सुरू आहे. त्यानुसार कल्याण येथून दुर्गाडीपर्यंत सुमारे ६.५५ किमी अंतरापर्यंत या मेट्रोचा विस्तार केला जाणार आहे.
मेट्रो ५ चा प्रस्तावित विस्तार-
कल्याण येथून दुर्गाडी आणि उल्हासनगरपर्यंत मेट्रो ५ चा विस्तार प्रस्तावित आहे. या एकत्रित विस्तारीत मार्गाची लांबी ११.८२ किमी असेल.
भवानी चौकातून मेट्रो मार्ग नेण्यावर विचार-
भवानी चौकातून हा मेट्रो मार्ग नेण्याचे विचाराधीन आहे. हीच मार्गिका पुढे उल्हासनगरपर्यंत नेली जाणार आहे. उल्हासनगरपर्यंतच्या विस्तारित मार्गाची लांबी सुमारे ५.७७ किमी असेल, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
या मेट्रो मार्गिकांना मेट्रो ५ बी आणि मेट्रो ५ सी असे संबोधले जाणार आहे. त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल अर्बन मास ट्रान्झिट कंपनीकडून तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. येत्या सहा महिन्यांत हा प्रकल्प अहवाल अंतिम केला जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मेट्रो ५ मार्गिकेचे काम सुरू -
१) मेट्रो ५ मार्गिकेच्या कापूरबावडी ते धामणकर नाका या १२.२० किमी लांबीच्या मार्गाचे काम सध्या सुरू आहे. या मार्गाची जवळपास ८५ टक्क्यांहून अधिक स्थापत्य कामे पूर्णत्वास गेली आहेत.
२) हा मार्ग सुरू करण्याच्या दृष्टीने एमएमआरडीएकडून प्रयत्न सुरू आहेत. आता पुढील काही महिन्यात धामणकर नाका ते कल्याण एपीएमसी या १२.३ किमी मार्गाचे काम सुरू करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.