मेट्रो ९ मार्गिकेची स्टेशन्स असणार आणखी प्रशस्त, मल्टिमॉडल इंटिग्रेशन पद्धतीने होणार विकास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 10:05 AM2024-07-29T10:05:44+5:302024-07-29T10:06:31+5:30

एमएमआरडीएकडून सध्या मेट्रो ९ मार्गिकेचे काम सुरू आहे.

in mumbai metro 9 stations will be more spacious developed in a multimodal integration manner | मेट्रो ९ मार्गिकेची स्टेशन्स असणार आणखी प्रशस्त, मल्टिमॉडल इंटिग्रेशन पद्धतीने होणार विकास

मेट्रो ९ मार्गिकेची स्टेशन्स असणार आणखी प्रशस्त, मल्टिमॉडल इंटिग्रेशन पद्धतीने होणार विकास

मुंबई : मेट्रो स्थानकांच्या परिसरातील वाहतूककोंडी टळावी, तसेच नागरिकांना स्थानकांवर सहजरीत्या पोहोचता यावे, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) मल्टी मॉडल इंटिग्रेशन पद्धतीने मेट्रो स्थानकांच्या परिसरात सुविधांची निर्मिती केली जात आहे. आता दहिसर पूर्व ते मीरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेच्या आठ मेट्रो स्थानकांच्या परिसराच्या विकासासाठी दोन कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. 

एमएमआरडीएकडून सध्या मेट्रो ९ मार्गिकेचे काम सुरू आहे. ही मार्गिका सुरू करण्याच्या अनुषंगाने एमएमआरडीएने प्रयत्न सुरू केले आहेत. प्रवाशांना मेट्रो स्थानकांवर सहजरीत्या पोहोचता यावे यासाठी सायकल मार्ग, बस, खासगी वाहने आणि सेवा पुरवठादार संस्थांच्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका आणि पादचारी मार्गाचा विस्तार यांसारख्या सुविधांची निर्मिती करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यातून दहिसर आणि मीरा-भाईंदर येथील नागरिकांना विनाअडथळा प्रवास करणे सहज शक्य होणार आहे, असा विश्वास एमएमआरडीएकडून व्यक्त करण्यात आला. 

सायकलच्या वापरावर भर-

मेट्रो स्थानकांवर येणारे प्रवासी हे घर अथवा कार्यालयातून बस, रिक्षा, दुचाकी, खासगी वाहने अथवा चालत येतात. 

एकाचवेळी मोठ्या संख्येने आलेल्या प्रवाशांमुळे स्थानकांच्या परिसरात कोंडीसदृश परिस्थिती निर्माण होते. तसेच या भागांत रस्त्यांवर आणि पदपथावर अतिक्रमणे झालेली आढळून येतात. स्थानकांच्या परिसरात अस्वच्छता दिसते. या सर्वांवर तोडगा काढून मेट्रो स्थानकांचा परिसर प्रवासीभिमुख केला जाणार आहे. पादचारी मार्ग, सायकल आणि सार्वजनिक वाहतूक सुविधेचा अधिकाधिक वापर होईल, यावर भर असणार आहे.

या स्थानकांत कामे -

दहिसर, पांडुरंगवाडी, मीरा गाव, काशीगाव, साईबाबानगर, मेडितियानगर, शहीद भगतसिंग स्थानक, सुभाषचंद्र बोस स्टेडियम येथे मल्टी मॉडल इंटिग्रेशनचे काम केले जाणार आहेत.

या कंत्राटदारांची नियुक्ती-

एमएमआरडीएकडून दोन पॅकेजमध्ये ही कामे केली जाणार आहेत. त्यामध्ये एका पॅकेजसाठी गजानन कंस्ट्रक्शन या कंपनीची नियुक्ती केली आहे, तर दुसऱ्या पॅकेजच्या कामासाठी एन. ए. कंस्ट्रक्शन आणि पीआरएस इन्फ्रा या कंपन्यांना संयुक्त भागीदारीत काम देण्यात आले आहे.

अशा असतील सुविधा-

१) मेट्रो मार्गिकेच्या २५० मीटर परिसरातील भागाचा विकास होणार.

२) पदपथांचे रुंदीकरण.

३) परिसराचे सुशोभीकरण.

४) सायकल ट्रॅकची निर्मिती.

५) मेट्रो स्थानकानजीकच बस, रिक्षा आणि खासगी वाहनांसाठी स्वतंत्र थांबे. यातून एकाच ठिकाणी होणारी गर्दी टळणा.

६) स्थानकांच्या परिसरात लेन मार्किंग, चिन्हे, बाके, ई-टॉयलेट आदींचा विकास.

७) सोलर आधारित स्ट्रीट लाईट, सीसीटीव्ही यंत्रणा बसविणार.

Web Title: in mumbai metro 9 stations will be more spacious developed in a multimodal integration manner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.