Join us  

चित्रपटाच्या चित्रीकरणातून मेट्रो झाली ‘मालामाल’; यावर्षी १७ लाख ७० हजार रुपयांची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 10:32 AM

मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या  मार्गिकेवर चित्रपट, मालिका, वेबसीरिज यांच्या चित्रीकरणासाठी देऊन त्यातून उत्पन्न मिळविण्याचा महामुंबई मेट्रोचा मानस आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : डीएननगर ते दहिसर मेट्रो २ अ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर मेट्रो ७ मार्गिका हे चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी देऊन महामुंबई मेट्रोने तब्बल १७ लाख ७० हजार रुपयांची कमाई केल्याने मेट्रो मालामाल झाली आहे. या माध्यमातून महामुंबई मेट्रोच्या तिजोरीत यावर्षी मोठी रक्कम जमा झाली आहे.

मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या  मार्गिकेवर चित्रपट, मालिका, वेबसीरिज यांच्या चित्रीकरणासाठी देऊन त्यातून उत्पन्न मिळविण्याचा महामुंबई मेट्रोचा मानस आहे. त्यादृष्टीने इव्हेंट मॅनेजमेंट फर्म, कार्यक्रम आयोजक, मीडिया प्रोडक्शन हाउस, शिक्षण संस्था, चित्रपट निर्माते, शासकीय संस्था यांना मेट्रो स्थानके आणि गाड्या चित्रीकरणासाठी भाड्याने देण्याचे धोरण महामुंबई मेट्रोने आखले आहे. 

मेट्रो गाडीतील चित्रीकरणासाठी प्रत्येक तासासाठी २ लाख ५० हजार, स्थानकातील अथवा डेपोतील चित्रीकरणासाठी प्रत्येक तासासाठी २ लाख ५० हजार रुपये भाडे आकारले जात आहे. तसेच यामधील दोन्ही ठिकाणच्या चित्रीकरणासाठी ३ लाख ७५ हजार रुपये आकारले जाते. 

मेट्रो ७ मार्गिका ही गोरेगाव आणि आरे कॉलनीजवळून जाते. याच्याजवळच फिल्मसिटी असल्याने चित्रीकरणासाठी मेट्रो मार्गिकेचा वापर केला जाईल, अशी अपेक्षा महामुंबई मेट्रोला आहे. मेट्रो मार्गिकेच्या संचालनाव्यतिरिक्त अन्य मार्गांतून उत्पन्न मिळविण्याचा महामुंबई मेट्रोचा प्रयत्न आहे. स्थानकावर आणि गाडीत जाहिरातींना परवानगी देणे,  स्थानकावर दुकानांसाठी जागा भाड्याने देणे असे पर्याय वापरले जात आहेत. 

भन्साळी प्रोड्क्शनच्या चित्रपटाचे चित्रीकरण-

यावर्षी संजय लीला भन्साळी प्रोडक्शन हाऊसच्या एका चित्रपटाचे चित्रीकरण मेट्रो स्थानकावर करण्यात आले. त्या चित्रपटाच्या चित्रीकरणातून मेट्रोला १७ लाख ७० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले, अशी माहिती मेट्रो १ च्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. 

टॅग्स :मुंबईमेट्रो