Join us  

मेट्रोचे प्रवासी २ लाख ८७ हजार; अंधेरी ते दहिसरदरम्यानच्या दोन मार्गिकांवर नवा उच्चांक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 10:22 AM

डी.एन.नगर ते दहिसर पूर्व ‘मेट्रो २ अ’ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व ‘मेट्रो ७’ मार्गिकेने दोन लाख ८७ हजार प्रवाशांचा टप्पा पार केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : डी.एन.नगर ते दहिसर पूर्व ‘मेट्रो २ अ’ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व ‘मेट्रो ७’ मार्गिकेने दोन लाख ८७ हजार प्रवाशांचा टप्पा पार केला आहे. या मेट्रो मार्गिकांनी दि. २५ सप्टेंबरला प्रवासी संख्येचा हा आकडा गाठला, अशी माहिती महामुंबई मेट्रोने दिली. 

या महिन्याच्या सुरुवातीला मेट्रोने २ लाख ८० हजार प्रवाशांचा टप्पा पार केला होता. त्यावेळी या मेट्रो मार्गिकांवरून एका दिवसांत २ लाख ८१ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. या प्रवासीसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, मेट्रोने प्रवासी संख्येचा आणखी एक उच्चांक गाठला आहे. मुंबई उपनगरात बुधवारी मुसळधार पावसाने झोडपल्याने शहरातील काही भागात पाणी साचले होते. त्यामुळे अनेकांनी मेट्रोने प्रवासाचा पर्याय निवडला. त्यातून मेट्रो स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली होती. ही गर्दी कमी करण्यासाठी महामुंबई मेट्रोने गुंदवली आणि अंधेरी पश्चिम येथून प्रत्येकी दोन अतिरिक्त सेवा चालवल्या. तसेच रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची सेवा बाधित झाली होती. त्यातून प्रवाशांनी मोनोतून प्रवासाचा पर्याय निवडला. मोनोरेल मार्गिकेवरील अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कालावधी वाढवून सहा अतिरिक्त सेवा चालविल्या, अशी माहिती महामुंबई मेट्रोने दिली.

या मेट्रोचा दुसरा टप्पा दि. २० जानेवारी २०२३ मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला. त्यानंतर या मार्गिकेवरून दि. २० जानेवारी २०२३ ते दि. २० फेब्रुवारी २०२४ दरम्यान ७ कोटी १७ लाख प्रवाशांनी प्रवास केला होता, तर दि. २८ मेपर्यंत पुढील तीन महिने आणि आठ दिवसांत यात आणखी दोन कोटी प्रवाशांची भर पडली होती. यंदा मे महिन्यापर्यंत या दोन्ही मेट्रो मार्गिकांवर मिळून दरदिवशी सुमारे २ लाख ४० हजार प्रवासी प्रवास करत होते. सध्या या मार्गिकेवर २४ मेट्रोद्वारे २८२ फेऱ्यांद्वारे प्रवाशांना सेवा दिली जात आहे.

टॅग्स :मुंबईमेट्रो