Join us  

दांडिया खेळून उशिरा घरी परतणाऱ्यांना मेट्रोचा दिलासा! ‘मेट्रो २ अ, ७’वर अतिरिक्त सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 9:33 AM

सद्य:स्थितीत या मेट्रो मार्गिकांवरून शेवटची गाडी रात्री ११ वाजता सुटते. नवरात्रोत्सवात या मेट्रो मार्गिकांवरून रात्री ११ ते मध्यरात्री १२:३० दरम्यान दर १५ मिनिटांनी विशेष गाडी चालविली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नवरात्रोत्सवात गरबा, दांडिया खेळून उशिरा घरी परतणाऱ्या मंडळींच्या सोयीसाठी अंधेरी ते दहिसर मेट्रो २ अ आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो ७ मार्गिकेवर महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनतर्फे अतिरिक्त १२ फेऱ्या चालविल्या जाणार आहेत. या मेट्रो मार्गिकांवर ७ ते ११ ऑक्टोबर दरम्यान शेवटची गाडी मध्यरात्री १२:३० वाजता सुटेल. 

सद्य:स्थितीत या मेट्रो मार्गिकांवरून शेवटची गाडी रात्री ११ वाजता सुटते. नवरात्रोत्सवात या मेट्रो मार्गिकांवरून रात्री ११ ते मध्यरात्री १२:३० दरम्यान दर १५ मिनिटांनी विशेष गाडी चालविली जाणार आहे. गुंदवली येथून सुटलेली शेवटची गाडी अंधेरी पश्चिम स्थानकावर उत्तर रात्री १:३९ वाजता पोहोचेल. तसेच अंधेरी पश्चिम स्थानकावरून सुटलेली मेट्रो गाडी गुंदवली येथे उत्तर रात्री १:३९ वाजता पोहोचेल. दरम्यान, अतिरिक्त १२ फेऱ्यांच्या वाढीमुळे या मेट्रो मार्गिकेवरील गाडीच्या फेऱ्यांची संख्या २९४ एवढी होणार आहे, अशी माहिती महामुंबई मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

नवरात्रोत्सवात सर्व भाविक व नागरिक यांना सुरक्षित वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारी आहे. त्याकरिता मेट्रो ट्रेनच्या फेऱ्या वाढविण्यात येत असून, रात्री उशिरा घरी परतणाऱ्या मंडळींची मोठी सोय होणार आहे, अशी प्रतिक्रिया महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली. 

वाढीव फेऱ्यांचे वेळापत्रक-

अंधेरी पश्चिम ते गुंदवली-

१) २३:१५ - ००:२४ 

२) २३:३० - ००:३९ 

३) २३:४५ - ००:५४ 

४) ००:०० - ०१:०९ 

५) ००:१५ - ०१:२४ 

६) ००:३० - ०१:३९ 

गुंदवली ते अंधेरी पश्चिम- १) २३:१५ - ००:२४ 

२) २३:३० - ००:३९ 

३) २३:४५ - ००:५४ 

४) ००:०० - ०१:०९ 

५) ००:१५ - ०१:२४ 

६) ००:३० - ०१:३९ 

टॅग्स :मुंबईमेट्रोएमएमआरडीए