गौरी टेंबकर, मुंबई: मुख्यमंत्री कोट्यातून म्हाडाचे घर मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकाला लाखो रुपयांचा चुना लावण्याचा प्रकार कांदिवलीत घडला. याप्रकरणी त्यांनी कांदिवली पोलिसात धाव घेतल्यानंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार कांतीलाल मेहता (५६) यांचा सोन्याच्या दागिन्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, लहानपणीच्या मित्राने निखिल दोशी नावाच्या व्यक्तीशी सात आठ वर्षांपूर्वी त्यांची ओळख करून दिली होती. दोशी याचा चष्म्याच्या फ्रेमचा व्यवसाय असून त्यांच्यात चांगली मैत्री झाली. दरम्यान पवई म्हाडा कॉलनी या ठिकाणी म्हाडाच्या सदनिका विक्रीसाठी असून माझी म्हाडा अधिकाऱ्यांसोबत ओळख आहे. तुम्हाला सीएम कोट्यामधून घर पाहिजे असल्यास सुरुवातीला तीन लाख रुपये भरावे लागतील आणि त्यानंतर तीस वर्षापर्यंत तीस ते चाळीस हजारापर्यंत ईएमआय भरावा लागेल. त्याकरिता सारस्वत बँकेमध्ये अकाउंट उघडावे लागेल असे सांगितले. तसेच ही सदनिका अलॉटमेंटच काम म्हाडा अधिकारी विलास चव्हाण करत असुन सहा महिन्यात घर ताब्यात मिळेल असेही दोशी म्हणाला. दोशी सोबत जुनी ओळख असल्याने तक्रारदार आणि त्यांचे दोन मित्र यांनी विश्वास ठेवत सदर व्यवहार करायची तयारी दाखवली.
तक्रारदाराने दोन घरे स्वतःच्या आणि एक घर जावयाच्या नावावर घ्यायचे ठरले. त्याकरिता त्यांनी ऑगस्ट, २०२० रोजी दोशीने दिलेले फॉर्म भरले आणि पुन्हा घर कधी मिळणार याबाबत विचारणा केली. त्यावेळी दोशी याने आज उद्या मिळून जाईल असे उत्तर दिले. पुढे एप्रिल, २०२१ मध्ये उच्च न्यायालयाने शासनाच्या दोन टक्के व पाच टक्के स्वच्छाधिकार कोट्यातील सदनिका वाटपावर प्रतिबंध घातल्यामुळे दोन टक्के शासन कोट्यातून सदनिका वाटप करता येऊ शकत नाही असे पत्र तक्रारदाराने दोशीला दाखवले. मात्र माझी म्हाडाचा अधिकाऱ्यांसोबत ओळख असून सहा महिन्यात अलॉटमेंट लेटर मिळेल असे तो म्हणाला. त्यानंतर २२ नोव्हेंबर २०२३ मध्ये स्वतःला म्हाडाचा अधिकारी म्हणवणाऱ्या विलास चव्हाण नावाच्या व्यक्तीने तक्रारदाराला एक यादी व्हाट्सअप केली. त्यामध्ये ४० जणांची नावे होती ज्यात तक्रारदार आणि त्यांच्या जावयाचेही नाव होते. याबाबत विचारणा केल्यावर ५ डिसेंबर रोजी म्हाडा कार्यालयात रजिस्ट्रेशन करण्याकरता यावे लागणार असून त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची लिस्ट पाठवली असल्याचे चव्हाण म्हणाला. मात्र सदर पत्रामध्ये अधिकाऱ्यांची सही नसल्याने तक्रारदाराला संशय आला आणि फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी कांदिवली पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी दोशी आणि चव्हाण या दोघांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३४, ४०६,४२०,४६५,४६८ आणि ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.