Join us

म्हाडाची घरे २ हजार आणि आतापर्यंत अर्ज आले ७३ हजार! १९ सप्टेंबरपर्यंत मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 10:03 AM

म्हाडाच्या २ हजार ३० सदनिकांसाठी आतापर्यंत ७३ हजार ६०४ अर्ज आले असून, त्यापैकी ५२ हजार ८९८ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : म्हाडाच्या २ हजार ३० सदनिकांसाठी आतापर्यंत ७३ हजार ६०४ अर्ज आले असून, त्यापैकी ५२ हजार ८९८ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे. म्हाडाच्या लॉटरीमध्ये अधिकाधिक नागरिकांना सहभाग घेण्याची संधी उपलब्ध व्हावी, म्हणून ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला १९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

म्हाडाला बिल्डरकडून प्राप्त झालेल्या गृहसाठ्यापैकी ३७० सदनिकांची विक्री किंमत सुमारे १० ते २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत. त्यात अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किमती २५ टक्क्यांनी, अल्प गटातील २०, मध्यम गटातील १५, उच्च गटातील किमती १० टक्क्यांनी कमी करण्यात आल्याने अर्जांमध्ये वाढ झाल्याचे समोर येत आहे.

घराकरिता अर्ज -

अर्ज करण्यासाठी https://housing.mhada.gov.in या वेबसाइटचा व ॲपचाच वापर करावा. अर्ज नोंदणी करताना इच्छुक अर्जदारांचा मोबाइल नंबर आधारशी लिंक असणे गरजेचे आहे. नोंदणी करतेवेळी अर्जदाराला डीजी लॉकर या ॲपमध्ये स्वतःसह पती-पत्नीचे आधार व पॅन कार्ड अपलोड करून ते लिंक करणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत उपलब्ध घरांसाठी अर्ज करण्याकरिता योजनेच्या पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी नसल्यास विजेत्या अर्जदारास म्हाडा सोडत पश्चात नोंदणी करून देणार आहे. 

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी...

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सहा लाख रुपयांपेक्षा कमी असावे. पती-पत्नी यांच्या नावे देशात कुठेही पक्के घर नसावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

डोमिसाइल सर्टिफिकेट-

म्हाडाच्या घराच्या लॉटरीसाठी अर्ज करताना अर्जदाराने १  जानेवारी २०१८ रोजी नंतर जारी केलेले व बारकोड असलेले महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) अपलोड करणे आवश्यक आहे.

टॅग्स :मुंबईम्हाडा