म्हाडाचे 'ते' फ्लॅट पडले महागात! फसवणुकीच्या घटनांत वाढ, एजंटमार्फत व्यवहार न करण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 12:10 PM2024-08-21T12:10:09+5:302024-08-21T12:12:34+5:30

गरिबांना परवडणारी घरे देणारी संस्था म्हणून महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) ची ओळख आहे.

in mumbai mhada that flats became expensive increase in cases of fraud appeal not to transact through agents | म्हाडाचे 'ते' फ्लॅट पडले महागात! फसवणुकीच्या घटनांत वाढ, एजंटमार्फत व्यवहार न करण्याचे आवाहन

म्हाडाचे 'ते' फ्लॅट पडले महागात! फसवणुकीच्या घटनांत वाढ, एजंटमार्फत व्यवहार न करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गरिबांना परवडणारी घरे देणारी संस्था म्हणून महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) ची ओळख आहे. मात्र, प्रत्यक्षात म्हाडा अव्वाच्या सव्वा किमतींना सध्या घरांची विक्री करत आहे. त्यामुळे घरांच्या शोधात असणारे सर्वसामान्य नागरिक हे स्वस्तात घरे देण्याचे प्रलोभन दाखविणाऱ्यांच्या जाळ्यात अडकतात. त्यात त्यांना ना फ्लॅट मिळत ना भरलेले पैसे परत मिळतात. त्यामुळे त्यांची आर्थिक फसवणूक होते.

म्हाडाचा फ्लॅट देण्याचे आमिष दाखवत सैन्य दलातील माजी कर्मचाऱ्याची ऑगस्टमध्ये ३४ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी शशिकांत कदम, यासीन शेख, संतोष कदम या त्रिकुटावर गुन्हा नोंदवला.

सीएम कोट्याचे घर-

मुख्यमंत्री कोट्यातून म्हाडाचे घर मिळवून देण्याचे आमिष दाखवत निखिल दोशी याने एका व्यावसायिकाकडून लाखो रुपये उकळल्याची घटना जुलै २०२४ मध्ये घडली. याप्रकरणी पीडितेने कांदिवली पोलिसात तक्रार दिली. त्याआधारे दोशी व स्वतःला म्हाडा अधिकारी म्हणवणाऱ्या विलास चव्हाण याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

बनावट वेबसाइटपासून सावधान-

म्हाडाची हुबेहूब मात्र बनावट वेबसाइट तयार करून त्याद्वारे घरासाठी इच्छुक असलेल्यांची फसवणूक केल्याप्रकरणी एका शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

म्हाडाच्या किमतीपेक्षा पाच ते दहा लाख रुपये कमी किमतीत घरे देण्याचे आमिष या भामट्याने दाखवल्याचा आरोप आहे. म्हाडाच्या इमारतीत लॉटरी पद्धतीनेच फ्लॅट मिळतो. त्यामुळे एजंटमार्फत तो मिळवण्याचा प्रयत्न करत स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेऊ नका. तसेच असा प्रकार झाल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार द्या, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

चावीही दिली, पण...

म्हाडाचा फ्लॅट स्वस्तात देण्याचे प्रलोभन दाखवत जुलै २०२४ मध्ये गृहिणीकडून २३ लाख रुपये लाटण्यात आले. या प्रकरणात संशयित आरोपी नीरज विश्वकर्मा (३५) आणि स्नेहा वेरणेकर (४८) यांनी तक्रारदाराला फ्लॅटची चावीही दिली होती. मात्र, ती चावी बोगस असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी तपास सुरू आहे.

फ्लॅट मिळालाच नाही-

दहिसरमध्ये एका नर्सला लॉटरीत ११ वर्षापूर्वी म्हाडाचे घर लागले. पण जातपडताळणी प्रमाणपत्राअभावी तिची फाइल बंद केल्याचे एजंटने तिला सांगत कागदपत्रावर तिच्या सह्या, अंगठा घेत ते घर लाटले. याप्रकरणी नर्सने नोव्हेंबर २०२३ मध्ये दहिसर पोलिसात धाव घेत सुनील जंगापल्ले (५६) याच्याविरोधात तक्रार दिली.

Web Title: in mumbai mhada that flats became expensive increase in cases of fraud appeal not to transact through agents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.