Join us

म्हाडा मास्टर लिस्टवरील रहिवाशांना घरे देणार; ३० हजार अर्जदार अजूनही प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 10:26 AM

म्हाडाकडून २६५ अर्जदारांची लॉटरी करण्यात आली होती.

मुंबई : म्हाडाच्यामुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मास्टर लिस्टवरील पात्र अर्जदारांना सोडतीद्वारे वितरित झालेल्या घरांच्या देकार पत्राचे वाटप गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ३० जुलै रोजी दुपारी १२ वाजता करण्यात येणार आहे. म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन मुख्यालयातील भारतरत्न गुलझारीलाल नंदा सभागृहात हा  कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

म्हाडाकडून २६५ अर्जदारांची लॉटरी करण्यात आली होती. मात्र, या लॉटरीनंतर काही आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्यामुळे या सगळ्या अर्जदारांची पुन्हा एकदा पडताळणी करण्यात आली. आता २६५ पैकी १५८ अर्जदारांनी स्वीकृती पत्र म्हाडाला दिले असून, त्यांना देकार पत्र दिले जाईल. 

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील उपकरप्राप्त इमारतीमधील ज्या भाडेकरू/ रहिवासी यांना निष्कासन सूचना (व्हेकेशन नोटीस) देऊन इमारत खाली करण्यात आली आहे, त्यांच्या मूळ इमारतीचा अरुंद भूखंड, आरक्षण, रस्ता रुंदीकरण या कारणामुळे पुनर्विकास शक्य नाही. तसेच उपकरप्राप्त इमारती पुनर्रचित झाल्या आहेत, मात्र कमी गाळे बांधले गेले आहेत, अशा वंचित मूळ भाडेकरू/ रहिवासी यांना यापूर्वी मंडळाद्वारे पुनर्रचित / पुनर्विकसित इमारतीमध्ये कायमस्वरूपी गाळा देण्यात आलेला नाही. त्यांचे वारसदार संक्रमण शिबिरात किंवा इतर ठिकाणी राहत आहेत, अशा बृहतसूचीवरील पात्र मूळ भाडेकरू / रहिवासी अथवा त्यांचे वारसदार यांची संगणकीय सोडत काढण्यात येते. त्यानुसार घरांचे वाटप केले जाते. दक्षिण मुंबईमध्ये राहत असलेल्या अनेक रहिवाशांचे पुनर्विकासादरम्यान आलेल्या विविध अडचणींमुळे पुनर्वसन होऊ शकलेले नाही, अशांचा म्हाडाच्या मास्टर लिस्टवरील आकडा सुमारे ३० हजार आहे. 

टॅग्स :मुंबईम्हाडा