मतदारसंघांतील कामांसाठी आमदारांचे महापालिकेत ठाण; आयुक्तांच्या दालनात बैठकांना जोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 09:36 AM2024-08-08T09:36:30+5:302024-08-08T09:37:29+5:30

विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्याने मुंबईतील आमदारांची धावपळ सुरू झाली आहे.

in mumbai mla are stationed in the municipal corporation for work in the constituencies, the vidhan sabha attention emphasis on meetings in the commissioners hall | मतदारसंघांतील कामांसाठी आमदारांचे महापालिकेत ठाण; आयुक्तांच्या दालनात बैठकांना जोर

मतदारसंघांतील कामांसाठी आमदारांचे महापालिकेत ठाण; आयुक्तांच्या दालनात बैठकांना जोर

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्याने मुंबईतील आमदारांची धावपळ सुरू झाली आहे. महापालिका स्तरावरील प्रश्न सोडविण्यासाठी विभाग कार्यालये, मुख्यालयात आमदारांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांची कार्यालयेही सध्या आमदार आणि त्यांच्यासोबत येणारी शिष्टमंडळे आणि कार्यकर्त्यांनी गजबजलेली पाहायला मिळत आहेत.

वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी पालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभागातील विविध शिष्टमंडळांसह  पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. यावेळी स्थानिक समस्यांसह बेस्ट, कोस्टल रोडच्या बाजूचे होर्डिंग्ज, गणेशोत्सव, डिलाइल रोड आदींवर त्यांनी चर्चा केली. त्यानंतर भाजपचे आमदार आशिष शेलार, दहिसरमधील आमदार मनीषा चौधरी आणि मुलुंडमधील आमदार मिहीर कोटेचा यांनीही आयुक्तांची भेट घेतली. 

नागरिकांच्या बाजूने राहण्याचा प्रयत्न -

मुंबईतील अनेक आमदारांनी आपापल्या मतदारसंघात जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य शिबिरांचे आयोजित करणे, विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणे, विविध कामांच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला जात आहे. 

पालिकेच्या ज्या धोरणांना नागरिकांचा विरोध आहे, असे मुद्दे उचलून धरले जात आहेत. लालबागमधील फेरीवाल्यांनी साखळी आंदोलन सुरू केले असून, आमदार अजय चौधरी देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. बोरिवलीमध्ये भाजपचे आमदार सुनील राणे यांनी ही फेरीवाला मुक्त बोरिवलीसाठी पुढाकार घेतला आहे.  

खासदारांचेही पक्ष बांधणीसाठी प्रयत्न-

१) निवडणुकांच्या निमित्ताने मतदारसंघातील पाण्याच्या समस्येपासून झाडांच्या छाटणीपर्यंतच्या समस्यांच्या तक्रारी पालिकेकडे येऊ लागल्या आहेत. या शिवाय रस्ते, खड्डे, तुंबणारे पाणी यांच्या प्रभागांतील समस्यांच्या तक्रारी नियमित केल्या जाऊ लागल्या आहेत. 

२) विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील कामे आणि त्यांच्यावरील नियंत्रण आमदार याद्वारे आपल्या हाती घ्यायचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. आमदारांसोबत निवडून आलेले खासदारही पक्ष बांधणीसाठी प्रयत्न करीत आहेत. विविध कामांसाठीची पत्रे खासदारांच्या माध्यमातून पालिकेत येत असून, विधानसभेची मोर्चेबांधणी यातून करण्याचा प्रयत्न होत आहे.

सप्टेंबरला आचारसंहिता-

विधानसभेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदार पुन्हा कामाला लागले आहेत. नगरसेवकांची मुदत संपल्यामुळे पालिका स्तरावरील प्रश्न घेऊन आमदार कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह पालिका मुख्यालय, विभाग कार्यालयात येत आहेत. 

Web Title: in mumbai mla are stationed in the municipal corporation for work in the constituencies, the vidhan sabha attention emphasis on meetings in the commissioners hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.