Join us  

धावत्या मोनोत मोबाइलचा स्फोट; प्रवाशांना पाठविले दुसऱ्या गाडीतून

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 10:03 AM

संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर मोनो मार्गिकेवरील धावत्या मोनो गाडीत एका प्रवाशाच्या मोबाइलचा स्फोट झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९.३० वाजता घडली.

मुंबई : संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर मोनो मार्गिकेवरील धावत्या मोनो गाडीत एका प्रवाशाच्या मोबाइलचा स्फोट झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९.३० वाजता घडली. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. मात्र या घटनेनंतर ती मोनो गाडी सेवेतून बाजूला काढण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

मोनो मार्गिकेवरील कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्वरित मोबाइलला लागलेली आग विझविली. या घटनेनंतर जीटीबी नगर स्थानकात त्या गाडीतील सर्व प्रवाशांना उतरविण्यात आले आणि त्यांना पाठीमागून आलेल्या दुसऱ्या गाडीतून पुढील प्रवासासाठी पाठविले.  प्रवासादरम्यान प्रवाशाच्या मोबाइलला आग लागली असली तरी सुरक्षिततेच्या कारणावरून ती मोनो गाडी तपासणीसाठी पाठविली आहे. पूर्ण तपासणीनंतरच ती गाडी पुन्हा सेवेत समाविष्ट केली जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवाशांनी मोबाइलची वेळोवेळी तपासणी करावी. मोबाइल अधिक गरम झाला असल्यास त्याचा वापर थांबवावा, असे आवाहन महा मुंबईमेट्रोने केले आहे. 

सहा गाड्यांमधून सेवा; ११८ फेऱ्या -

१) सद्यस्थितीत मोनो मार्गिकेवर ८ गाड्या उपलब्ध आहेत. यामधील ६ गाड्यांतून प्रत्यक्षात वाहतूक सेवा दिली जाते. दरदिवशी सहा गाड्यांमार्फत ११८ फेऱ्या होत आहेत.

२) सध्या या मार्गिकेवर दर १८ मिनिटांच्या वारंवारितेने मोनो गाड्या धावत आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मोनो मार्गिकेवर अतिरिक्त १० गाड्या खरेदी करण्यासाठी मेधा सर्व्हो ड्राइव्हज या कंपनीला ऑक्टोबर २०२१ मध्ये कंत्राट दिले आहे. 

३) या गाड्या सेवेत दाखल झाल्यानंतर मोनो मार्गिकेवरील गाड्यांची वारंवारिता पाच मिनिटांवर येऊन फेऱ्यांची संख्या २५० पर्यंत पोहोचेल.

टॅग्स :मुंबईमोनो रेल्वेमोबाइलमेट्रो