Join us  

कोणाचा मोबाइल, कोणाचे मूल हरवले; विजयोत्सवानंतर तक्रारींसाठी पोलीस ठाण्यात रांग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 9:46 AM

टी-२० विश्वचषक विजेत्यांच्या विजयोत्सवासाठी गुरुवारी मरिन ड्राइव्ह येथे झालेल्या अलोट गर्दीमुळे काही क्रिकेट चाहत्यांचे मोबाइल गायब झाल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

मुंबई : टी-२० विश्वचषक विजेत्यांच्या विजयोत्सवासाठी गुरुवारी मरिन ड्राइव्ह येथे झालेल्या अलोट गर्दीमुळे काही क्रिकेट चाहत्यांचे मोबाइल गायब झाल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. तसेच, काही लहान मुले हरवल्याने पालकांनीही पोलीस ठाण्यात हंबरडा फोडला. आतापर्यंत मोबाइल चोरीच्या ६४ तक्रारी मरिन ड्राइव्ह पोलिसांकडे आल्या आहेत. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे,  तर गर्दीत हरवलेल्या १३ अल्पवयीन मुलांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

‘टीम इंडिया’च्या स्वागतासाठी लाखोंची गर्दी रस्त्यावर उतरली. मरिन ड्राइव्ह परिसर आणि वानखेडे स्टेडियममध्ये क्रिकेट चाहत्यांचे जत्थे पाहायला मिळाले. विजयोत्सवानंतर एकाच वेळी सगळे बाहेर पडल्याने कुठेही गालबोट लागू नये, म्हणून पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. गर्दीवर नियंत्रण आणताना पोलिसांची दमछाक झाली. मात्र, त्यांनी सर्व परिस्थिती सुरळीतपणे हाताळली. यादरम्यान १० ते १२ जण चक्कर येऊन कोसळले. यावेळी पोलिस त्यांच्यासाठी आधार ठरले. भोवळ आलेल्या मुलीला खांद्यावर घेत पोलिसाने तिला बाहेर काढले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर  व्हायरल होत आहे. सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. 

६० लेखी, ४ ऑनलाइन तक्रारी -

१) अलोट गर्दीमुळे अनेकांचे मोबाइल खाली पडले. तर काहींच्या मोबाइलवर चोरट्यांनी हात साफ केला. 

२) आतापर्यंत ६० लेखी, तर ४ ऑनलाइन तक्रारी मरिन ड्राइव्ह पोलिसांना मिळाल्या आहेत. तर, काही १० ते १२ मोबाइल फोन पोलिसांना बंदोबस्तादरम्यान सापडले. संबंधितांशी संपर्क करून काही फोन परत करण्यात आले आहेत. तर, काहींचे मोबाइलच्या मालकांचा शोध सुरू आहे. ऑनलाइन तक्रारीचा आकडा वाढण्याची शक्यताही पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.

१३ मुले पालकांच्या ताब्यात-

आपले मूल हरवल्याने पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी, पोलिसांनी गर्दीतून ७ ते ८ वयोगटांतील १३ मिसिंग मुलांचा शोध घेत त्यांना सुखरूप पालकांच्या ताब्यात दिले आहे.

टॅग्स :मुंबईट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारतीय क्रिकेट संघपोलिस