मुंबई : तुमच्या बालकाला ठरावीक कालावधीत लस दिली आहे का, वेळ निघून तर गेली नाही ना? एकच लस दोनदा दिली गेली आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधत बसण्याची वेळ आता पालकांवर येणार नाही. मोबाइलच्या एका क्लिकवर लसीकरणाचा सगळा तपशील उपलब्ध होईल. केंद्र सरकारच्याआरोग्य खात्याने विकसित केलेले ‘यू विन’ मोबाइल ॲप आता ही सगळी माहिती तुमच्या मोबाइलमध्ये जतन करणार आहे. यापुढे देशातील कोणत्याही भागातील पालक देशाच्या कोणत्या भागातून आपल्या बालकाला लस देता येईल. फक्त बालकेच नाही तर गर्भवतींच्या लसीकरणाचा तपशीलही या ॲपमध्ये जतन होणार आहे.
मूल जन्माला आल्यापासून दहा वर्षांपर्यंत टप्प्याटप्प्याने विविध लसी द्याव्या लागतात. बीसीजी, हेपिटायटीस-बी, धनुर्वात, डांग्या खोकला, पोलिओ, चिकनगुनिया, कावीळ, मेंदूज्वर आदी विविध लसी द्याव्या लागतात. नऊ महिने ते १० वर्षे या कालावधीत हे लसीकरण करणे आवश्यक असते.
काय आहे यू विन ॲप-
या ॲपमध्ये आपल्या बालकाला कोणती लस, कधी दिली, पुढील लस कधी द्यायची? असा तपशील असतो. एक लस देऊन झाल्यावर ॲपमध्ये त्याची नोंद होते. पुढील लस द्यायची असेल तेव्हा मोबाइलवर रिमाइंडर येतो. त्यामुळे लसीकरणाची तारीख चुकणार नाही.
फायदे आणि त्रुटी-
लसीकरणाची माहिती संकलित होणार, उपलब्ध लसीची माहिती आगाऊ मिळणार. त्यामुळे लसीकरण वेळेत होईल. लसीकरण वेळेत झाल्यामुळे बालमृत्यू टळतील. लसीकरणाचे प्रमाण वाढेल. देशात कुठेही लस घेता येईल. या ॲपचा फायदा आहे. मात्र, काही महागड्या लसीही मिळण्याची सोय उपलब्ध असावी. मेंदूज्वर, चिकनपोक्स, हेपिटायटीस-बी (बूस्टर डोस) न्यूमोनिया या लसी महाग असतात. या लसींचा समावेशही या ॲपमध्ये करावा. हे ॲप स्मार्ट फोनमध्ये डाउनलोड करता येते. मात्र, अनेक गरिबांकडे असे मोबाइल नसतात. त्यामुळे त्यांची वेगळी नोंद करावी. आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन या ॲपचा प्रसार करावा. - डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन