मान्सूनचे मिशन कम्प्लिट! 'मध्य वैतरणा'चे ५ दरवाजे उघडले; जलाशयांतील साठा ९० टक्क्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 09:40 AM2024-08-05T09:40:33+5:302024-08-05T09:42:00+5:30
मध्य वैतरणा धरण भरल्यामुळे आता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठा हा ९० टक्क्यांहून अधिक झाला आहे.
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांपैकी एक असलेले हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरण शनिवारी उत्तर रात्री २ वाजून ४५ मिनिटांनी काठोकाठ भरून वाहू लागले. सध्या या धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून, त्यातून ७०६.३० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या जलअभियंता विभागातर्फे देण्यात आली आहे.
मध्य वैतरणा धरण भरल्यामुळे आता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठा हा ९० टक्क्यांहून अधिक झाला आहे. यामुळे मुंबईकरांची पुढच्या वर्षीच्या जूनपर्यंतची पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबई महापालिकेने पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात १०२.४ मीटर उंचीचे आणि ५६५ मीटर लांबीचे मध्य वैतरणा धरण बांधले आहे. मध्य वैतरणा धरणाची कमाल पाणी साठवण क्षमता ही १,९३,५३० दशलक्ष लिटर (१९,३५३ कोटी लिटर) इतकी असून हे सातपैकी दुसऱ्या मोठ्या पाणी साठवण क्षमतेचे जलाशय आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मोखाडा तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मध्य वैतरणा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. शनिवारी उत्तर रात्री २ वाजून ४५ मिनिटांनी धरणाचे दोन दरवाजे १० सेंटिमीटरने उघडण्यात आले होते. यातून ७०६.३० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र, पावसाचा जोर आणखीन अधिक वाढल्याने पाण्याची पातळी २८४.२४ मीटर झाली. त्यामुळे सकाळी ९ वाजेच्या सुमारास धरणाचे पाचही दरवाजे ४० सेंटीमीटरने उघडण्यात आले. त्यामुळे वैतरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पाच जलाशय काठोकाठ-
१) धरणांच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये शनिवारी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे ऊर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही जलाशयांतील पाणीसाठा रविवारी पहाटे ८९.१० टक्के झाला.
२) मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातपैकी पाच जलाशये काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे जूनपर्यंतची चिंता मिटल्याने प्रशासनाकडून मागच्या आठवड्यात पाणीकपातही मागे घेण्यात आली आहे.
३) पालिकापाणीकपात रद्द केल्याने वितरण व्यवस्थेच्या टोकाच्या वस्त्या, गृहनिर्माण संस्था आदी ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल, तसेच पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल, असे पालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले.