सलग ५ वर्षे परवानगीसाठी १७०० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अर्ज; ५० % अर्ज मंजूर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 10:05 AM2024-08-30T10:05:00+5:302024-08-30T10:06:45+5:30

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपाची परवानगी देण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या एक खिडकी उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

in mumbai more than 1700 board applications for permission for sarvajanik ganeshotsav mandal mandap 5 consecutive years so far 50 percent of applications have been approved | सलग ५ वर्षे परवानगीसाठी १७०० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अर्ज; ५० % अर्ज मंजूर 

सलग ५ वर्षे परवानगीसाठी १७०० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अर्ज; ५० % अर्ज मंजूर 

लोकमत न्यूज नेटवर्क,मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपाची परवानगी देण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या एक खिडकी उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या २३ दिवसांत शहरातील अडीच हजारांहून अधिक मंडळांचे अर्ज पालिकेकडे आले आहेत. यापैकी ५० टक्के अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. तर, उर्वरित प्रक्रिया येत्या ४ ते ५ दिवसांत पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. या अर्जामध्ये जवळपास एक हजार ५८० मंडळांनी सार्वजनिक ठिकाणी, तर २०४ मंडळांनी खासगी जागेत सलग पाच वर्षे मंडप परवानगीसाठी अर्ज केले आहेत. 

यंदा ६ ऑगस्टपासून मंडप परवानगीकरिता पालिकेने एक खिडकी प्रक्रिया सुरू केली. पालिकेकडे आतापर्यंत तीन हजारांहून अधिक अर्ज आले आहेत, मात्र त्यातील ३९२ अर्ज दुबार असल्याचे छाननी प्रक्रियेत आढळून आले. त्यामुळे सरासरी अर्जाची संख्या दोन हजार ६६६ असून, त्यापैकी ५० टक्के म्हणजे एक हजार ३०० हून अधिक अर्जांना पालिकेकडून परवानगी मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सलग पाच वर्षे मंडप परवानगीसाठीच्या नियमांत पालिकेकडून बदल करण्यात आल्याने अनेक मंडळांकडून यासाठीही अर्ज करण्यात आले आहेत. सलग पाच वर्षे परवानगीसाठी एक हजार ७०० मंडळांनी अर्ज केले आहेत. या मंडळांना पुढील वर्षी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसून, केवळ आपल्या परवानगीचे ऑनलाइन नूतनीकरण करावे लागणार आहे. यामुळे पालिका कार्यालयातील त्यांच्या फेऱ्या वाचणार आहेत. दरम्यान पालिकेकडून सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सर्व ती तयारी केली जात आहे.

अर्जांचा ओघ सुरूच -

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, तरी मंडळांकडून मंडपाच्या परवानगीसाठी अर्जांचा ओघ सुरूच आहे. मात्र पालिकेच्या एक खिडकी उपक्रमात अर्ज करण्यासाठी कोणतीही मुदत नसल्याने मंडळ अगदी शेवटच्या क्षणापर्यंत परवानगीसाठी अर्ज करू शकणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने छाननी प्रकियेला आणखी गती दिला जाईल. शिवाय शनिवार आणि रविवारीही परवानगीसाठी ही प्रक्रिया सुरू ठेवण्यात येईल. - प्रशांत सपकाळे, उपायुक्त तथा गणेशोत्सव समन्वयक पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना मिळावी, यासाठी पालिकेकडून ६११ टन शाडूची मूर्ती मूर्तिकारांना पुरविण्यात आली आहे. मूर्तिकारांना ही माती उपलब्ध व्हावी यासाठी विभागनिहाय २० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली. 

Web Title: in mumbai more than 1700 board applications for permission for sarvajanik ganeshotsav mandal mandap 5 consecutive years so far 50 percent of applications have been approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.