Join us

आषाढीसाठी सवलतीत प्रवास! एसटीकडून तिकीट दरात सूट; भाविकांसाठी महामंडळाची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 10:28 AM

आषाढी वारीसाठी पंढरपूरकरिता एसटी महामंडळाने जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.

मुंबई : आषाढी वारीसाठी पंढरपूरकरिता एसटी महामंडळाने जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार, मुंबईतून २०० जादा बस सोडण्यात येत असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. प्रवासात ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत. यामुळे भाविकांना दिलासा मिळाला आहे.

पंढरपूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटीने यात्रा काळात पाच हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे. यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे. 

१३ ते २२ जुलैपर्यंत यात्रा-    सप्तमी- १३ जुलै- यात्रेची सुरुवातनवमी- १५ जुलै    -रिंगणएकादशी- १७ जुलै- एकादशी

७०० बसची व्यवस्था-

भाविकांच्या वाढीव गर्दीकरिता ७०० बसची व्यवस्था करण्यात येत आहे. परतीची वाहतूक एकादशीच्या दिवसापासून सुरू होते आहे. त्याकरता दशमीपर्यंत जास्तीत जास्त गाड्या प्रत्येक विभागाकडे उपलब्ध राहतील, यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

१२ ठिकाणी तपासणी नाके-

१) गतवर्षी एसटीने आषाढी यात्रेनिमित्त ४२४५ विशेष बस सोडल्या होत्या. याद्वारे यात्रा काळामध्ये १८ लाख ३० हजार ९३४ भाविक प्रवाशांची सुखरूप ने-आण एसटीने केली होती. 

२) फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे. 

३) फुकट्या प्रवाशांना अटकावासाठी एसटीचे २०० सुरक्षा कर्मचारी, अधिकारी यात्रा काळात २४ तास नजर असेल.

टॅग्स :मुंबईआषाढी एकादशीची वारी 2022