Join us

साथीचे आजार रोखण्यासाठी मनपाचा खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर बडगा;८३ हातगाड्या,१०५ सिलिंडर जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 09:40 IST

पावसाळ्यात उद्भवणारे साथीचे आजार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने चायनीज, वडापाव विक्रीचे बेकायदा स्टॉल, हातगाड्या लावणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली.

मुंबई : पावसाळ्यात उद्भवणारे साथीचे आजार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने चायनीज, वडापाव विक्रीचे बेकायदा स्टॉल, हातगाड्या लावणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली. या विशेष मोहिमेंतर्गत १८ जून रोजी अतिक्रमण निर्मूलन विभागाने ८३ अनधिकृत हातगाड्या आणि १०५ सिलिंडर जप्त केले आहेत. विशेष म्हणजे पालिकेच्या सात परिमंडळांतील पथक आपल्या हद्दीपुरतेच मर्यादित न राहता शेजारील परिमंडळांतही जाऊन कारवाई करत आहे.

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, कावीळ, स्वाइन फ्लू या साथरोगांना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र, रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाल्ल्याने होणारे आजार रोखण्यासाठी आता मुंबईतील खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यात फुटपाथ, रेल्वे स्टेशन परिसरातील बेकायदा स्टॉलवर कारवाई करण्यात येत असून, यासाठी पालिकेच्या सात परिमंडळांत पथक स्थापन केले आहे. 

१) परिमंडळ एकचे पथक परिमंडळ दोनमध्ये कारवाई करणार आहे. यामुळे बेकायदा स्टॉल लावणाऱ्यांना पळण्याची संधी मिळणार नाही.

२) विशेष म्हणजे, हे पथक सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत कारवाई करणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

साहित्य परत मिळण्यासाठी विक्रेत्यांना भरावा लागणार दंड -

अनधिकृत विक्रेत्यांकडून वापरले जाणारे खाद्यपदार्थांचे ट्रक, गॅस सिलिंडर आणि इतर उपकरणे प्रशासनाकडून जप्त करण्यात आली आहेत. मंगळवारी झालेल्या कारवाईत एकूण ३५८ प्रकारचे साहित्य जप्त करण्यात आले असून ते डी, एच पूर्व आणि एल विभागातील नियुक्त गोदामांत ठेवण्यात आले आहे.

विक्रेत्यांना त्यांचा माल परत मिळवण्यासाठी दंड भरावा लागणार आहे. २०२१ पासून ११ हजार ८११ हून अधिक गॅस सिलिंडर जप्त केले असून, ते संबंधित कंपन्यांना परत करण्यात आले आहे.

गोरेगाव पूर्वेतील मृणालताई गोरे उड्डाणपुलाजवळील बेकायदा हातगाड्यांवर पालिकेच्या पथकाने बुधवारी कारवाई केली. त्यामुळे तेथील विक्रेत्यांची पळापळ झाली.

१) एल, एम पश्चिम, एस पूर्व, एन, एस, टी - एकूण जप्त साहित्य - ८९ 

२) ए, बी, सी, डी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर, जी दक्षिण, जी उत्तर -एकूण जप्त साहित्य - १६८ 

३) एच पूर्व, एच पश्चिम, के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर -एकूण जप्त साहित्य - १०१

टॅग्स :मुंबईनगर पालिकामोसमी पाऊस