लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : श्वानांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज या रोगापासून बचावाच्या उद्देशाने महानगरपालिकेच्यावतीने ‘रेबीजमुक्त मुंबई’साठी पुढाकार घेण्यात आला आहे. या अंतर्गत २८ सप्टेंबरपासून संपूर्ण मुंबईमध्ये व्यापक लसीकरण मोहीम हाती घेण्यात येत आहे. तसेच रेबीजबाबत मुंबई महानगरात विविध ठिकाणी जनजागृतीही करण्यात येत आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने २०३० पर्यंत भारत रेबीजमुक्त करण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा आखला आहे. त्याअंतर्गत महानगरपालिकेने २०२२ मध्ये मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प हाती घेतला होता. याच पार्श्वभूमीवर ‘वर्ल्ड वाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस-मिशन रेबीज’ यांच्यासोबत मिळून महापालिकेच्या वतीने २८ सप्टेंबरपासून भटक्या श्वानांच्या लसीकरणासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे.
ऑगस्ट महिन्यात ६५ शाळांमधील सुमारे १३ हजार ३३२ विद्यार्थ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. यामध्ये २७१ शिक्षक आणि ७९३ नागरिकांनीही सहभाग नोंदवला. भटके किंवा पाळीव श्वानांचे लसीकरण, निर्बिजीकरण करणे तसेच यासंदर्भात तक्रारी किंवा विनंती नोंदवण्यासाठी महापालिकेच्यावतीने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.