मनपा रुग्णालयांत आता रुग्णाला मिळणार युनिक कोड; आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली होणार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 11:14 AM2024-08-31T11:14:38+5:302024-08-31T11:16:54+5:30
या प्रणालीमुळे नागरिकांना अधिक डिजिटल पद्धतीने वैद्यकीय सेवेचा लाभ घेता होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सर्व रुग्णालय आणि दवाखान्यात आरोग्यसेवा आणखी सुलभतेने मिळण्यासाठी आता आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली अर्थात हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिमचा वापर करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना अधिक डिजिटल पद्धतीने वैद्यकीय सेवेचा लाभ घेता होणार आहे.
या प्रणालीसाठी लवकरच प्रकल्प अभ्यास, हार्डवेअर आणि नेटवर्किंग सर्वेक्षण तसेच आराखडा तयार करण्यात येईल. त्यासोबतच अंमलबजावणीच्या अनुषंगाने यंत्रणेची चाचपणी, डिझाइन, विकास आणि एचएमआयएस ॲप्लिकेशनची अंमलबजावणी आदी बाबींवर काम करण्यात येईल. तसेच एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात पाठविणे, तज्ज्ञांची वेळ घेणे हेदेखील या प्रणालीमध्ये समाविष्ट असेल. भविष्यात विविध संशोधनांसाठी या प्रणालीची मदत होणार आहे. महापालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये या यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात येईल. त्यापाठोपाठ सर्व प्रसूतिगृहांच्या ठिकाणी योजना अमलात येईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व उपनगरीय रुग्णालये तसेच विशेष रुग्णालयाच्या ठिकाणी पुढच्या टप्प्यात यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच शेवटच्या टप्प्यात सर्व महत्त्वाच्या रुग्णालयांत ही यंत्रणा अमलात येईल.
काय होणार?
१) रुग्णाची नोंद, डॉक्टरांचा सल्ला, आवश्यक असल्यास निदान चाचणी, त्यानंतर औषधालयाच्या माध्यमातून औषध उपलब्धता या सर्व प्रक्रिया नव्या प्रणालीच्या माध्यमातून पार पाडल्या जातील. यामध्ये प्रत्येक रुग्णाला एक युनिक कोड उपलब्ध करून दिला जाईल.
२) पालिकेच्या कोणत्याही दवाखाना किंवा रुग्णालयात याआधी उपचार घेतले असल्यास रुग्णाशी संबंधित सर्व माहिती नव्या प्रणालीमध्ये एका क्लिकवर उपलब्ध होईल. एखाद्या रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात संदर्भित करण्यासाठीही या प्रणालीचा वापर करण्यात येईल.
३) केस पेपरसाठीची रांग टाळण्यासाठी आता टोकन पद्धतीचा वापर केला जाणार आहे. तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधांची माहिती नातेवाइकांनाही समजू शकेल.
काय फायदे?
१) या प्रणालीमुळे आरोग्य सुविधांचे सुयोग्यरीत्या व्यवस्थापन करणे शक्य होईल. रुग्णालयाच्या ठिकाणी रुग्णांशी संबंधित आजारांची स्वतंत्र माहिती तयार करण्यासोबतच संशोधनासाठीही वाव मिळेल.
२) बाह्य रुग्णांसाठी आणि अपघात विभागासाठी व्यवस्थापन प्रणाली विकसित करणेही शक्य होईल. राज्य पातळीवरील आणि केंद्राच्या आरोग्य योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देण्यासाठी यंत्रणेचा प्रभावी वापर करता येईल.
३) औषध पुरवठा व्यवस्थापन करतानाच नियोजन तसेच भविष्यातील गरजेनुसार तयारी करण्यासाठीही या प्रणालीचा उपयोग होणार आहे.