लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गणेशोत्सवात निर्माण होणाऱ्या शेकडो टन निर्माल्यापासून पालिका कंपोस्ट खत निर्माण करणार आहे. हे खत पालिकेच्याच उद्यानातील झाडांसाठी वापरण्यात येणार आहे. या निर्माल्यातून पालिकेची उद्याने बहरणार आहेत. सर्व २४ वॉर्डना घनकचरा विभागाकडून निर्माल्य जमा करण्यासाठी सुमारे ३०० वाहने देण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवासाठी पालिकेने आवश्यक सुविधा पुरविण्यास सुरुवात केली आहे. आगमन-विसर्जन मार्गांची दुरुस्ती आणि विसर्जनासाठी सुविधा पुरवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. हे निर्माल्य कचऱ्यात टाकता येत नसल्यामुळे स्वतंत्ररीत्या जमा केले जाते. मात्र याच्या विल्हेवाटीचा मोठा प्रश्न मंडळांसमोर असतो. त्यामुळे पालिकेने हे निर्माल्य स्वतंत्ररीत्या जमा करावे अशी मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून निर्माल्य स्वतंत्ररीत्या जमा करून त्यापासून खतनिर्मिती केली जाणार असल्याची माहिती घनकचरा विभागाकडून देण्यात आली.
निर्माल्याचे पावित्र्यही राखले जाणार-
निर्माल्य वाहनांसह सुमारे १५० मोठे निर्माल्य कलश विविध ठिकाणी निर्माल्य जमा करण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनीही गणेशोत्सवात निर्माण होणारे निर्माल्य नैसर्गिक प्रवाह, नदी, समुद्र, खाडीमध्ये न टाकता पालिकेने व्यवस्था केलेल्या या कलशांमध्येच टाकावे असे आवाहनही पालिकेच्या घनकचरा विभागाकडून करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत मुंबईत सुमारे ३०० मेट्रिक टन निर्माल्य जमा होते. हे निर्माल्य स्वतंत्र वाहनांमधून जमा केले जाणार आहे. यानंतर संस्थांच्या माध्यमातून निर्माल्याचे स्वतंत्ररीत्या कंपोस्टिंग करून खतनिर्मिती केली जाईल. निर्माण झालेले खत पालिकेच्या उद्यानातील झाडांना वापरण्यासाठी वॉर्डनिहाय समन्वय साधून देण्यात येईल. निर्माल्याचे कंपोस्टिंग कचऱ्यासोबत नाही तर स्वतंत्ररीत्या केले जाणार असल्याने त्याचे पावित्र्यही राखले जाणार आहे.