Join us

वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर पालिकेचे जाहिरात फलक; नव्या धोरणाच्या अंमलबजावणीपर्यंत सूट की कानाडोळा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 11:19 AM

मुंबई महानगरपालिकेने गेल्याच आठवड्यात बहुचर्चित जाहिरात धोरणाचा मसुदा जाहीर केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महानगरपालिकेने गेल्याच आठवड्यात बहुचर्चित जाहिरात धोरणाचा मसुदा जाहीर केला, मात्र त्यातील नियमावलीकडे पालिकेच्याच अन्य विभागांनी दुर्लक्ष केले जात आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावर रस्त्याच्या मधोमधच पालिकेने जनजागृतीच्या जाहिरातींसाठीचे फलक लावले आहेत. हे फलक डिजिटल स्वरूपाचे असून, वाहनचालकांचे त्यामुळे लक्ष विचलित होत असल्याची तक्रार वाहनचालकांनी केली आहे. त्यामुळे नवीन जाहिरात धोरणातील तरतुदींची अंमलबजावणी केव्हापासून होणार आणि हे फलक हटवले जाणार का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

जाहिरात फलकांबाबतचे धोरण नुकतेच महापालिकेने प्रसिद्ध केले असून, त्यावर नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. या धोरणात अनेक नव्या नियमांचा समावेश करण्यात आला आहे. 

त्यात रस्त्याच्या मध्ये असणाऱ्या वाहतूक दुभाजकावर फलक लावता येणार नाही, रस्त्यांच्या वरून जाणाऱ्या पादचारी पुलाच्या कमानीवर जाहिरात लावता येणार नाही, रस्त्याच्या मध्येच डोकावणाऱ्या जाहिराती लावता येणार नाही असे अनेक नियम घालण्यात आले आहेत. 

मात्र पश्चिम द्रुतगती मार्गावरील मृणालताई गोरे उड्डाणपुलावर वाहतूक दुभाजकावर जाहिरात फलक आहेत. याच मार्गावर डिजिटल जाहिरातींचे फलकही लावले असून, त्यावरील रंगीबेरंगी चलतचित्रांमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होत असल्याची तक्रार वॉचडॉग फाउंडेशनने पालिका प्रशासनाला केली आहे. अद्याप हे धोरण मंजूर झालेले नसल्याने हे नियम मोडणाऱ्यांकडे पालिक दुर्लक्ष करतेय का असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने इतरांसाठी जे नियम केले आहेत ते आधी स्वत: पाळावे, अशी प्रतिक्रिया वॉचडॉगचे पिमेंटा गॉडफ्रे यांनी दिली.

तत्काळ अंमलबजावणी-

१) मुंबई पालिका प्रशासनाकडून नवीन जाहिरात धोरण २०२४चा मसुदा अंतिम करण्यात आला असून, धोरणाचा हा मसुदा मुंबई पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर मुंबईकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आहे. पुढील १५ दिवसांत ते यावर आपल्या सूचना आणि हरकती नोंदवू शकणार आहेत.

२) त्यानंतर त्यात आवश्यकता असल्यास काही सुधारणा होऊन लागलीच त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नवीन धोरणाच्या नियमानुसार या पश्चिम द्रुतगती मार्गावरील फलक ही हटविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईनगर पालिकाजाहिरात