Join us  

पावसात मॅनहोल्सचे झाकण उघडू नका, पालिकेचे आवाहन; संरक्षक जाळ्यांचे काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 11:23 AM

यंदाच्या पावसाळ्यात तरी मॅनहोल्समुळे होणारे अपघात टळतील, अशी अपेक्षा करण्यात येत आहे.

मुंबई : पावसात मॅनहोल्समध्ये कोणीही पडून अपघात होऊ नये, यासाठी मलनिस्सारण आणि पर्जन्य जलवाहिन्यांवरील एकूण १ लाख २८६ हजार मॅनहोल्समध्ये संरक्षक जाळ्या बसवण्याची प्रक्रिया पालिकेने ७ जूनपर्यंत पूर्ण केली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात तरी मॅनहोल्समुळे होणारे अपघात टळतील, अशी अपेक्षा करण्यात येत आहे. मात्र, मॅनहोलवरील झाकणे नागरिकांनी उघडू नयेत, असे आवाहन पालिकेने समाजमाध्यमांद्वारे केले आहे.

मुंबईकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि पावसाळ्यात जलवाहिन्यांमध्ये कचरा अडकून पाणी साचू नये, यासाठी मॅनहोल्समध्ये संरक्षक जाळ्या बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यासाठी सुरुवातीला जाळ्यांचा प्रोटोटाइप बनवण्यात आला. त्यानंतर जाळ्या बसवण्यास सुरुवात झाली. हे काम ३१ मेच्या आधी होणे अपेक्षित होते. एक लाख संरक्षक जाळ्या बसवण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, २४ मेपर्यंत त्यातील केवळ ४३ हजार ५८१ संरक्षक जाळ्या मॅनहोल्समध्ये बसवण्यात आल्या होत्या.

बॅरिकेड्सचा उपाय -

मॅनहोलवरील झाकण चोरीला जाणे, तसेच मॅनहोलमधून पाणी ओव्हरफ्लो होण्याच्या घटना नेहमीच घडतात. त्याला आळा घालण्यासाठी मॅनहोलवर सायरन वाजून अलर्ट देणारी यंत्रणा मुंबईतील १४ ठिकाणी बसवून त्याची गेल्या तीन महिन्यांपासून चाचणी घेण्यात येत होती. त्यावेळी तांत्रिक अडचणी आणि यंत्रणाही उपयुक्त ठरत नसल्याने गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेली ही चाचणी बंद करण्यात आली. 

पावसाळ्यात मॅनहोल काही कारणास्तव उघडे राहिल्यास त्याला तात्पुरते बॅरिकेड्स लावण्यात येणार आहेत. काही उघड्या मॅनहोलमध्ये झाडाची फांदी किंवा लाकडी सामान ठेवण्याचेही प्रकार केले जातात. मात्र, तसे न करता आता तात्पुरते बॅरिकेड्स लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :मुंबईनगर पालिकामोसमी पाऊस