लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईलापाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर धरणातील गाळ काढण्याबाबत केंद्रीय जल आयोगाच्या निकषानुसार सर्वेक्षण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सर्वेक्षणाचे हे काम दोन टप्प्यांत होणार आहे. त्यानुसार तांत्रिक व्यवहार्यता तपासण्याचे काम पूर्ण झाले असून, दुसऱ्या टप्प्यात उपलब्ध पाणी पातळीचा आणि पाण्याच्या तळाच्या पातळीचा अभ्यास केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील अहवाल आल्यानंतर पालिका धरणातील गाळाबाबत पुढील निर्णय होईल, असे समजते.
धरणातील गाळाच्या सर्वेक्षणासाठी अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेशी (मेरी) पालिकेने पत्रव्यवहार केला आहे. ‘मेरी’ने या कामासाठी सहमती दर्शवली आहे. दरम्यान, सर्वेक्षणाच्या टप्पा क्रमांक १ मध्ये अभ्यासाची तांत्रिक व्यवहार्यता तपासण्याचे काम पूर्ण झाले असून, त्याचा अहवाल त्यांनी पालिकेच्या जल अभियंता विभागाला सदर केला आहे.
हायब्रिड पद्धतीने होणार अभ्यास-
पहिल्या टप्प्याच्या सर्वेक्षणाच्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे गाळ सर्वेक्षणाचा अभ्यास हा हायब्रीड पद्धतीने म्हणजे उपलब्ध पाण्याची पातळी ते पाण्याच्या तळापर्यंतचा अभ्यास होणार आहे. त्यासाठी संबंधित पायाभूत सुविधा ‘मेरी’कडे उपलब्ध आहेत. अचूक प्रमाण प्राप्त करण्यासाठी गाळ सर्वेक्षणाकरिता डीजीपीएस आधारित बाथीमेट्री तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या कामासाठी ‘मेरी’ शुल्क घेणार आहे. मेरी, गृह विभाग, बंदरे–परिवहन आणि महाराष्ट्र जल आलेख कार्यालयामार्फत बंदरे, खाडी, नदी, तलावांचे हायड्रोग्राफिक्स सर्वेक्षण करण्यात येणार आहे.