Join us

अस्वच्छता करणाऱ्यांना पालिकेचा दणका; ५३ हजार नागरिकांकडून केले दीड कोटी वसूल 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 9:36 AM

मुंबईतील २४ वॉर्डांमध्ये  एप्रिलपासून ८५८ मार्शल नियुक्त करण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबईत अस्वच्छता करणाऱ्यांना ५३ हजार नागरिकांना मुंबई महापालिकेच्या क्लीनअप मार्शलनी दणका देत, त्यांच्याकडून दीड कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. सर्वात जास्त दंड शहर भागातील ‘ए’ वाॅर्डातून वसूल करण्यात आला आहे. 

मुंबईतील २४ वॉर्डांमध्ये  एप्रिलपासून ८५८ मार्शल नियुक्त करण्यात आले आहेत. रस्त्यावर कचरा फेकणे, थुंकणे, नैसर्गिक विधी करणे, यासाठी १०० ते एक हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जातो. ‘ए’ वॉर्डात १५ हजार ५५० जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ३१ लाख ३३ हजार रुपये दंड आकारण्यात आला. त्यानंतरची मोठी कारवाई आर-मध्य वॉर्डात झाली. या भागात ३,६१३ जणांकडून १४ लाख चार हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. त्यापाठोपाठ के-पूर्व  (अंधेरी) भागातून ११ लक्ष ३९ हजार दंडाची रक्कम जमा झाली. आर- दक्षिण (कांदिवली) वॉर्डात २,६५५ जणांवर कारवाई झाली आणि १० लाख ७१ हजार रुपये दंड घेण्यात आला. मुलुंडच्या ‘टी’ वॉर्डात अस्वच्छता पसरविणाऱ्यांचे प्रमाण कमी दिसून आले. या भागात  १८३ जण अस्वच्छता करताना सापडले. त्यांना १ लाख ४१ हजार दंड आकारण्यात आला.

‘ए’ वॉर्डात सर्वात जास्त मार्शल-

‘ए’ वॉर्डात अनेक सरकारी, खासगी कार्यालये, उद्योजकांची कार्यालये, मोठी हॉटेल, मंत्रालय, महापालिका, पर्यटन स्थळे, खरेदी-विक्रीची मोठी दुकाने, छत्रपती शिवाजी टर्मिनस, चर्चगेट स्थानक आहे. त्यामुळे या भागात रोज लाखो लोक येत असतात. साहजिकच, या ठिकाणी दिवसभर वर्दळ असते. या वॉर्डात पालिकेने ११२ मार्शल तैनात केले आहेत.

२००७ नंतर पुन्हा मार्शलची नियुक्ती-

१) क्लीनअप मार्शल सर्वात आधी २००७ साली नियुक्त करण्यात आले होते. काही काळ त्यांनी सेवा दिली. 

२) मात्र, नंतरच्या काळात सामान्य लोकांना धमकावणे, जबरदस्तीने दंड गोळा करणे, अशा तक्रारी त्यांच्याविरोधात येऊ लागल्या. त्यामुळे क्लीनअप मार्शल सेवा गुंडाळण्यात आली.

टॅग्स :मुंबईनगर पालिकाकचरा प्रश्न