Join us

काँक्रीटच्या रस्त्यांचा दर्जा काय ? पालिका करणार ‘कोअर टेस्ट’, गुणवत्ता राखण्याचे आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 9:41 AM

मुंबईतील सर्व रस्त्यांचे येत्या दोन वर्षांत काँक्रिटीकरण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे.

मुंबई : मुंबईतील सर्व रस्त्यांचे येत्या दोन वर्षांत काँक्रिटीकरण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. मात्र, प्रत्येक रस्त्याच्या कामाचा दर्जा तपासण्यासाठी पालिकेकडून ‘कोअर टेस्ट’ (सामर्थ्य चाचणी) केली जाणार आहे. मुंबई उपनगरात सोमवारपासून या चाचणीला सुरुवात झाली आहे. 

गुणवत्तेची हमी व नियंत्रण या माध्यमातून फक्त काँक्रीटचे रस्ते अस्तित्वात येणार नाहीत, तर या रस्त्यांचा दर्जाही सर्वोत्कृष्ट राहील, यावर रस्ते विभागाचा भर असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी यावेळी दिली. त्यामुळे या माध्यमातून कंत्राटदारांवरही अधिकाधिक दर्जेदार कामे करण्याचे बंधन असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

पहिल्या टप्प्यात एकूण ३२४ किलोमीटरच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी २९.३७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत, तर दुसऱ्या टप्प्यातील नियोजित कामांसाठी सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. रस्त्यांचे काँक्रिटीकरण करताना कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये, तसेच तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने कामे व्हावीत, असे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. दरम्यान, या प्रकल्पांतर्गत हाती घेतलेली कामे तांत्रिकदृष्ट्या योग्य आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत, यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील तज्ज्ञांनी पालिकेच्या अभियंत्यांना विचारमंथन कार्यशाळेत मार्गदर्शन केले होते.

रस्ते कामांमध्ये गुणवत्तेची हमी व नियंत्रणासाठी विविध स्तरांवर उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून पश्चिम उपनगरात अंधेरी पूर्वेत मांजरेकर वाडी मार्ग आणि विलेपार्ले येथे दीक्षित मार्ग येथे सोमवारी रस्ते विभागाकडून कोअर टेस्ट करण्यात आली. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर हे स्वतः उपस्थित होते. ही चाचणी करताना संयंत्राद्वारे काँक्रिटच्या रस्त्याचा भाग वर्तुळाकार पद्धतीने कापण्यात आला. या भागाची आता चाचणी होणार आहे. 

‘कोअर टेस्ट’ म्हणजे काय ?

१)  ‘कोअर टेस्ट’मध्ये काँक्रीटच्या रस्त्यासाठी वापरलेल्या साधनसामग्रीचे गुणोत्तर, टिकाऊपणा, एकजिनसीपणा, भारवहन या अनुषंगाने विविध परिमाणांच्या निकषांवर सामर्थ्य चाचणी केली जाते. काँक्रीटच्या रस्त्याचे सामर्थ्य तपासणे हे चाचणीचे मुख्य उद्दिष्ट आहे.

‘आयआयटी’ला पत्र -

१)  पश्चिम उपनगरात कोअर टेस्टमध्ये गोळा केलेल्या काँक्रीटच्या नमुन्याची चाचणी आयआयटी मुंबई आणि शासकीय प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणार आहे. 

२) त्यासाठी पालिकेने ‘आयआयटी’कडे पत्रव्यवहारही केला आहे.

रस्त्याचे निकृष्ट काम कंत्राटदारांकडून खपवून घेतले जाणार नाही. तसेच अशा गुणवत्ता चाचण्या सर्व कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. - अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकारस्ते सुरक्षामोसमी पाऊस