सण आयलाय गो...नारली पुनवेचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 09:50 AM2024-08-19T09:50:20+5:302024-08-19T09:51:27+5:30
वेसावा कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा परंपरेनुसार साजरी केली जाणार आहे.
मनोहर कुंभेजकर,लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सोन्याचा नारल वाहिन मी तुला... हे देवा तारु येऊ दे बंदराला... कोळी बांधव अथांग सागरला अशी साद घालत वेसावे, मढ, भाटी, मालवणी, गोराई, जुहू, खारदांडा, माहीम, वरळी, धारावी, माहुल, कुलाबा येथील कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा साजरी केली जाईल.
वेसावा कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा परंपरेनुसार साजरी केली जाणार आहे. वेसावेत कोळी वेशभूषा करून मिरवणूक काढून सुमद्राला नारळ अर्पण केले जाते, असे मांडवी गल्ली कोळी समाज संस्थेचे वीरेंद्र मासळी व जोगेंद्र राजे यांनी सांगितले. हा हंगाम चांगला जाईल, अशी अपेक्षा प्रवीण भावे यांनी व्यक्त केली.
वरळी कोळीवाडा-
वरळी कोळीवाड्यात महिलांच्या नारळ फोडण्याच्या स्पर्धा होतात. माणिक धर्मा पाटील ट्रस्ट व हिरा कापर पाटील यांच्या मानाच्या पालख्या निघतात. मिरवणुकीबरोबर वाजत गाजत संध्याकाळी समुद्राला नारळ वाहिले जाते.
मढ कोळीवाडा-
१) मढ कोळीवाडा येथे परंपरेनुसार समुद्र देवाची पूजा करून मानाचा श्रीफळ अर्पण केला जातो.
२) धाकेश्वर भजन मंडळ, पातवाडी, मढ हे अखंड हरिनाम सप्ताह व दहीहंडीचे मानकरी आहेत, अशी माहिती महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी दिली.
कोळीवाड्यात महिलांच्या नारळ फोडण्याच्या स्पर्धा होतात.मिरवणुकीबरोबर वाजतगाजत संध्याकाळी समुद्राला नारळ वाहिले जाते.