Join us

‘सोन्याचा नारळ वाहीन... हे देवा तारू येऊ दे बंदराला’; कोळीवाड्यांमध्ये नारळी पौर्णिमेचा उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 9:51 AM

मुंबईतील वेसावे, मढ, भाटी, मनोरी, मालवणी, गोराई, जुहू, खारदांडा, माहीम, वरळी, धारावी, माहूल, कुलाबा येथील विविध कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा उत्साहात व जल्लोषात साजरी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नारळी पौर्णिमा हा कोळीवाड्यांतला महत्त्वाचा सण. अथांग सागरला ‘सोन्याचा नारळ वाहीन मी तुला...हे देवा तारू येऊ दे बंदराला’ अशी साद देत मुंबईतील वेसावे, मढ, भाटी, मनोरी, मालवणी, गोराई, जुहू, खारदांडा, माहीम, वरळी, धारावी, माहूल, कुलाबा येथील विविध कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा उत्साहात व जल्लोषात साजरी झाली. वेसावे कोळीवाड्यात मावळत्या सूर्याला साक्ष ठेवत सोन्याचा मुलामा दिलेला नारळ सागराला अर्पण करण्यात आला. 

कोळी महिलांनी ‘यंदा समुद्रात भरपूर म्हावंर लागू दे, आमच्या मासेमारीला जाणाऱ्या मच्छीमार  बोटी सुखरूप किनारी येऊ दे,’ अशी सागराची मनोभावे पूजन करून  प्रार्थना केली.  नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करून मासेमारीला सुरुवात करतो. 

समस्या सोडवण्यासाठी घातले गाऱ्हाणे-

१) मत्स्य व्यवसाय खात्याकडे राज्य शासन नेहमीच दुर्लक्ष करीत असल्याने महाराष्ट्र राज्य मासेमारी क्षेत्रामध्ये मागे पडत आहे. 

२) मत्स्य व्यवसायाला उद्योगाचा दर्जा द्यावा, तसेच शासनाने विविध समस्या सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर सागराला नारळ अर्पण केल्याचे कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके म्हणाले.

३) खारदांडा येथील कोळीवाड्यातील प्रत्येक पाड्यातून सोन्याचा नारळ सजवून मिरवणुका निघाल्या. शेवटी श्री राम मंदिर व समुद्र किनारी असलेल्या श्री हरबा माउली मंदिरात पूजा करून गाऱ्हाणे घालण्यात आले.

४)  यावेळी समुद्र किनारी कोळी नृत्य व संगीताचे कार्यक्रम आयोजित केले होते, अशी माहिती खार दांडा कोळीवाडा गावठाण संघाचे सचिव मनोज कोळी यांनी दिली.

टॅग्स :मुंबई