लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गुरुवारपासून नवरात्र उत्सवाला उधाण येणार आहे. भक्तिरसात नवरात्रीचा जागर न्हाऊन निघणार आहे. याबरोबरच नवरात्रीत सर्वांचे मोठे आकर्षण असते ते म्हणजे तरुणाईचे गरबानृत्य आणि दांडिया.
नवरात्रोत्सव आणखी उल्हासित करण्यासाठी, नाचतानाचे फेर धरण्यासाठी दांडिया सध्या बाजारात उपलब्ध आहेत. गरबा-दांडिया खेळताना कपडे आणि दागिन्यांप्रमाणे फॅशनेबल दांडिया वापरण्याकडे तरुणाईचा कल आहे. हाच कल लक्षात घेऊन बाजारात अनेक प्रकारच्या दांडिया आल्या आहेत.
ट्विस्ट दांडिया - स्टीलच्या दांडियामध्ये एक गोलाकार चक्र असते. त्यामुळे दोन्ही बाजूने दांडिया खेळू शकता. असे दांडिया लोकप्रिय आहेत, असे विक्रेते सुशांत सिंग यांनी सांगितले.
दांडियातील विविधता-
१) डिस्को दांडिया - डीजेच्या तालावर नाचण्यासाठी निऑन स्टिकचा वापर करतात. त्यांना आणखी मजबूत करून एलईडी स्टिक्स दांडिया बाजारात आले आहेत.
२) झुमकेवाले दांडिया - झुमके ही मुलींची आवडती गोष्ट आहे. रंगीबेरंगी आणि वर्कवाले झुमके दांडिया बाजारात उपलब्ध आहेत.
३) राजा-राणी दांडिया - राजस्थानमध्ये बाहुल्या प्रसिद्ध आहेत. त्या बाहुल्या मध्यभागी लावून दांडियाला अधिक आकर्षक बनवले जाते. तेही दांडिया उपलब्ध आहेत.
४) बांधणी दांडिया - पारंपरिक दांडियाला बांधणीचे कापड लावून या दांडिया तयार केल्या जातात. या दांडियाच्या खाली घुंगरूही असतात. या दांडियाचे वैशिष्ट्य म्हणजे यातली भन्नाट रंगसंगती.