आदिशक्तीच्या स्वागतासाठी बाजारपेठेत खरेदीला उधाण; नवरात्रोत्सवापूर्वी महिलांची लगबग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 09:23 AM2024-09-30T09:23:28+5:302024-09-30T09:25:34+5:30
येत्या गुरुवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी सुट्टीचा दिवस साधून मुंबईमधील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : येत्या गुरुवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी सुट्टीचा दिवस साधून मुंबईमधीलबाजारपेठांमध्ये खरेदीसाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पूजेच्या आणि सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांची आणि तरुणींची लगबग दिसून आली. सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात रंगीबेरंगी वस्त्र, आकर्षक दागिने, पारंपरिक सजावटीच्या वस्तूंनी दुकाने सजली आहेत.
आदिमाया, आदिशक्तीच्या आगमनाने घरोघरी मांगल्यपूर्ण वातावरण असते. घटस्थापनेपासून नऊ दिवस महिला देवीचा जागर करतात. महिलांनी रविवार सुट्टीचा दिवस साधून खरेदीला पसंती दिली. भुलेश्वर येथील बाजारातही तरुणींचा गरब्याचे कपडे, दांडिया, दागिने आणि सजावटीच्या विविध वस्तू घेण्याकडे कल पहायला मिळाला.
यावेळी कपड्यांचे आणि मण्यांचे तोरण, मोत्याच्या आणि फुलांच्या माळा, पारंपरिक पद्धतीचे विणलेले वॉल पीस, पट्टी, थ्रेड बांगड्या, कवड्यांच्या बांगड्या, ऑक्सिडाइज्ड धातूचा कंबर पट्टा, हार, कानाची बुट्टी, कानाचे सुरिया, बाजूबंद तसेच लाकडी, धातूच्या घुंगरांच्या दांडिया बाजारात पाहायला मिळत आहेत. भुलेश्वर बाजारात गर्दी असूनही महिलांचा खरेदीचा उत्साह मात्र कमी झालेला नव्हता. पुढील काही दिवस बाजार गजबजलेला राहिल, असे विक्रेत्यांनी सांगितले.
१) नवरात्रोत्सव सुरू होण्याआधीचा हा शेवटचा रविवार असल्याने ग्राहकांनी गर्दी केली होती. मुलींनी घागरा-चोळी, बांधणीचा कोट आणि तरुणांनी सदरा, लेहंगा, टोपी खरेदीला पसंती दिली. यावर्षी २-३ नवीन पद्धतीचे कपडे आल्याने आमच्याकडील स्टॉक देखील कमी पडत आहे. - जिनेश मेहता, कपड्यांचे व्यापारी.
२) नवरात्रीचे नऊ दिवस रोज वेगवेगळ्या रंगाचे कपडे आम्ही आवर्जून घालत असतो. त्यांच्यावर साजेशा दागिन्यांसाठी आम्हाला पूर्ण मार्केटभर फिरावे लागते. यावर्षी दागिन्यांमध्ये आणि कपड्यांमध्ये थोड्या व्हरायटी बघायला मिळत आहेत. - कविता राणे, ग्राहक.