Join us  

देवीच्या मूर्तींची किंमत १५ टक्क्यांनी वाढली; मेटॅलिक, फ्लोरोसेंट रंगांच्या मूर्तींना पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 10:03 AM

गणपतीनंतर मुंबईकरांना आता नवरात्रोत्सवाचे वेध लागले असून, त्यानिमित्ताने मूर्तीशाळांमध्ये देवीच्या मूर्तीवरून शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गणपतीनंतर मुंबईकरांना आता नवरात्रोत्सवाचे वेध लागले असून, त्यानिमित्ताने मूर्तीशाळांमध्ये देवीच्या मूर्तीवरून शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. यंदा ठिकठिकाणच्या मूर्तीशाळांमध्ये अंबामाता, महिषासुरमर्दिनी, रेणुका, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, सप्तश्रृंगी, काळूआई, सिंहासनावर विराजमान देवी अशा विविध रूपातील सहा इंचांपासून सात फुटांपर्यंतच्या मूर्ती साकारण्यात येत आहेत. यावर्षी या मूर्तीची किंमत ३ हजारांपासून १८ हजार रुपयांच्या घरात पोहोचल्याचेही आता समोर आले आहे.

याबाबत मूर्तिकार अरविंद काटकर  यांनी सांगितले की, आतापर्यंत १० ते १५ मूर्ती रंगवल्या असून, त्यात ३० टक्के घरगुती आहेत. गणेशोत्सवानंतर देवीच्या मूर्ती घडवण्यासाठी फार कमी अवधी मिळतो. त्यातच देवीचे डोळे, चेहरा, हास्य आदी कामे फार बारकाईने करावी लागतात. काही देवीच्या मूर्तीला खरी साडी नेसवली जात असल्याने  मूर्तीप्रमाणे साड्या शिवल्या जातात. काही देवींना मोती, हिरे अशा खऱ्या दागिन्यांचा साजही चढविला जातो. सध्या मेटॅलिक, फ्लोरोसेंट, वेल्वेट अशा आधुनिक स्वरूपाचे रंगकामही मूर्तींवर केले जाते. त्यामुळे एक मूर्ती घडविण्यासाठी साधारणत: २५ दिवस लागतात. त्यामुळे या मूर्तींचे फिनिशिंग अधिक परिश्रमाचे असते. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन यंदा देवीच्या मूर्ती मर्यादित संख्येत तयार करण्यात आल्या आहेत, असेही काटकर यांनी स्पष्ट केले.

मूर्तिकारांनी साकारली विविध रूपे-

१) यंदा प्लास्टर ऑफ पॅरिस, रंग, नारळाच्या काथ्या, मजुरी आदींच्या दरांमध्ये वाढ झाल्याने मूर्तीचे भावही १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत. 

२) परळ, चिंचपोकळी येथील रंगशाळेत महिषासूरमर्दिनी, कालिका माता, रेणुका, सप्तश्रृंगी माता अशी देवीचे विविध रुपे मूर्तिकारांनी साकारली आहेत.

टॅग्स :मुंबईनवरात्री