लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : येत्या काही दिवसांत नवरात्रोत्सवाचा जागर रंगणार आहे. नऊ दिवस सर्वत्र उत्साह, जल्लोषाचे वातावरण असते. आधी भोंडला खेळून साजऱ्या केल्या जाणाऱ्या नवरात्रोत्सवात आता मोठमोठ्या मैदानांवर डीजेच्या ठेक्यावर गरबा-दांडिया खेळला जात आहे. एक निखळ आनंद, नवरंगांतला उत्साह अशी संकल्पना असलेल्या या नवरात्रोत्सवाला आता प्रोफेशनल टच आला आहे. पारंपरिक पद्धतीने गरबा-दांडिया शिकण्याचा ट्रेंड हल्ली वाढताना दिसतोय. गरबानृत्य शिकण्यासाठी तरुण-तरुणींचा ओढा कार्यशाळांकडे वळू लागला आहे.
गरबा नृत्याबाबत आवड आणि जागरूकता गेल्या काही वर्षांत खूप वाढली आहे. शहरांमध्ये आयोजित होणाऱ्या गरबा-दांडिया खेळण्यासाठी तरुण-तरुणी उत्साही असतात. अनेक ठिकाणी गरबा नृत्याच्या स्पर्धाही घेतल्या जातात. यामध्ये बक्षीसही असते.
१) बक्षीस पटकावण्याच्या उद्देशानेही या नृत्य कार्यशाळांमध्ये अनेक जण दांडिया शिकायला आतापासूनच जात आहेत. या गरबा सोहळ्यांमध्ये ‘बेस्ट डान्सर’, ‘बेस्ट डान्सिंग जोडी’, ‘बेस्ट ग्रुप गरबा’ अशी वेगवेगळी बक्षिसे दिली जातात.
२) गरबा खेळायला गेल्यानंतर तिथे येणाऱ्या लोकांशी स्टेप्स जुळवून घेणे अवघड जायचे. त्यामुळे यंदा रीतसर क्लास लावून शिकायचे असे ठरवले. तसेच इतरवेळी फिटनेसकडे लक्ष दिले जात नाही. मात्र क्लासच्यानिमित्ताने व्यायामसुद्धा होतो आणि सणही साजरा करण्याची मजा येते. त्यामुळे नवीन डान्स टेक्निक शिकण्यासाठी क्लासला जाते.- श्वेता सोनटक्के, गोवंडी
गरबा-दांडियाचे प्रकार-
१) दोन टाळ्या, तीन टाळ्या, पाच स्टेप, आठ स्टेप, बारा स्टेप, काठीयावाडी, दोढीयु असे गरब्याचे, तर सहा हात, आठ हात असे दांडियाचे वेगवेगळे पारंपरिक प्रकार या सर्व क्लासेसमध्ये शिकवतात.
२) सध्या मुंबई प्रकार, बॉलीवूड प्रकार, फ्यूजन गरबा असेही वेगवेगळे प्रकार यात समाविष्ट झालेले आहेत. महिला मंडळे, वेगवेगळे क्लब्स यांच्या माध्यमातून गरबा प्रशिक्षणाचे वर्ग चालू आहेत.
३) मुंबईमध्ये अशा प्रशिक्षण देणाऱ्या एका क्लासमध्ये साधारण शंभर लोकांचा सहभाग असतो. यामध्ये तरुणींची संख्या जास्त आहे.