लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबई सेंट्रल येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) एप्रिल ते ऑगस्ट २०२४ या पाच महिन्यांच्या कालावधीत एकूण २७ हजार ९०४ नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. या वाहन नोंदणीतून आरटीओला २७५ कोटी ९६ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. यात कार, दुचाकी, बस, इलेक्ट्रिक वाहने, ट्रक, तसेच शासकीय आणि खासगी वाहनांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी या कालवधीत झालेल्या वाहन नोंदणीच्या तुलनेत, यंदा १०.१४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२३ मध्ये परिवहन विभागाला वाहन विक्रीतून मिळालेला महसूल २४९ कोटी सात लाख ५१ हजार रुपये होता. या वर्षी वाहन विक्रीतील वाढ ही महसूल वाढीस कारणीभूत ठरली आहे.
वाहतूक व्यवस्था आता सुधारणार-
नवीन वाहनांच्या नोंदणीतून आरटीओला महसुलाचा विनियोग शहरातील वाहतूक व्यवस्थापनाच्या सुधारणा, नवीन वाहतूक पायाभूत सुविधा उभारणी यांसारख्या विविध योजनांसाठी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
ईव्ही खरेदीकडे कल-
१) इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करण्याकडे मुंबईतील नागरिकांचा कल वाढत आहे.
२) गेल्या काही वर्षांत, वाहन कर्जसुविधा सुलभ झाल्यामुळे आणि वाहनांच्या किमतीत स्पर्धात्मक बदल झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहने खरेदी होऊ लागली आहे.
३) त्याचबरोबर, इलेक्ट्रिक वाहनांवरील करसवलतीमुळेही वाहन नोंदणीत वाढ झाली आहे.
सणासुदीत वाहन खरेदीला येणार तेजी-
१) आरटीओ अधिकाऱ्यांच्या मते, येणाऱ्या काळातही ही वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.
२) सणासुदीमध्ये वाहन खरेदीच्या प्रमाणात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे यावर्षीचे एकूण वाहन नोंदणी २०२३ पेक्षा अधिक होणार असल्याचेही त्यांचे मत आहे.
पार्किंगवर तोडगा आवश्यक-
मुंबई शहरातील वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे वाहतुकीवरील ताण आणि पार्किंगच्या समस्याही वाढत चालल्या आहेत. परिवहन विभाग वाहन विक्रीतून मिळणाऱ्या महसुलावर अवलंबून असताना, वाहतुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकासावरही भर देणे आवश्यक आहे, असे मत वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.