पाळीव प्राण्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी आणखी एक रुग्णालय; महालक्ष्मी येथील पशुवैद्यकीय रुग्णालय लवकरच सेवेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 10:22 AM2024-05-29T10:22:40+5:302024-05-29T10:27:19+5:30

मुंबईत पाळीव व भटक्या प्राण्यांच्या आरोग्यासाठी महालक्ष्मी येथे पशुवैद्यकीय रुग्णालयाची इमारत उभारण्यात आली आहे.

in mumbai new animal hospital in mahalakshmi will be in service till the end of june  | पाळीव प्राण्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी आणखी एक रुग्णालय; महालक्ष्मी येथील पशुवैद्यकीय रुग्णालय लवकरच सेवेत

पाळीव प्राण्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी आणखी एक रुग्णालय; महालक्ष्मी येथील पशुवैद्यकीय रुग्णालय लवकरच सेवेत

मुंबई :मुंबईत पाळीव व भटक्या प्राण्यांच्या आरोग्यासाठी महालक्ष्मी येथे पशुवैद्यकीय रुग्णालयाची इमारत उभारण्यात आली आहे. जून अखेरपर्यंत हे रुग्णालय सेवेत येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. या रुग्णालयात जनावरांवर २४ तास उपचार होणार आहेत. त्यामुळे आपल्या पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे पालिका रुग्णालय प्राणिमित्रांना उपलब्ध होणार आहे.  

मुंबईत सुमारे एक लाख १५ हजार पाळीव प्राणी आहेत. त्यात गायी, म्हशी, बैल, शेळ्या-मेंढ्या, श्वान आदींचा समावेश आहे. पाळीव श्वानांची संख्या ३६ हजार ५००, तर भटक्या श्वानांची संख्या ९८ हजार ७०० पेक्षा जास्त आहे. मांजरांची संख्याही मोठी आहे. या प्राण्यांना अद्ययावत उपचार मिळावेत यासाठी सध्या पालिकेचा खार येथे एकच पशुवैद्यकीय दवाखाना आहे. तर, मुंबई शहर व उपनगरात सुमारे २०० खासगी पशुवैद्यकीय दवाखाने आणि मुंबई सोसायटी फॉर प्रिव्हेंशन ऑफ कुएल्टी टू ॲनिमल संस्थेचे परळ येथे खासगी रुग्णालय आहे.  ही यंत्रणा अपुरी पडत असल्याने पालिकेने या रुग्णालयाची उभारणी टाटा ट्रस्टच्या सहकार्याने केली आहे. तसेच देखभाल, वैद्यकीय सेवाही टाटा ट्रस्ट करणार आहे. 

पालिकेने पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी महालक्ष्मी येथे टाटा ट्रस्टला ४,३४०.१९ चौरस मीटर जागा दिली आहे. या रुग्णालयात प्राण्यांवर अद्ययावत आणि अत्याधुनिक उपचार सवलतीच्या दरांत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर मुंबई पालिका व टाटा ट्रस्ट यांच्यात करार करण्यात आला आहे.

अशा असतील सुविधा-

१) आयसीसीयू, ब्लड बँक, डायलेसिस सेंटर अशा सुविधा या रुग्णालयात असतील. तसेच हे रुग्णालय सुमारे ४०० लहान प्राण्यांच्या उपचार क्षमतेचे असेल. 

२) रुग्णालयात जखमी, आजारी, भटक्या जनावरांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. त्यांच्यासाठी २४ तास मोफत रुग्णवाहिकेची सेवाही पुरवली जाणार आहे. 

३) शस्त्रक्रिया, गायनॉकोलॉजी, अपघात, इमर्जन्सी वॉर्ड, आयसीयू, कॅन्सर वॉर्ड, बर्न ॲण्ड स्कीन वॉर्ड, ओपीडी मेडिसिन-ओपीडी, सीटीस्कॅन, एमआरआय, रेडिओलॉजी सोनोग्राफी, ब्लॅड बँक, डायलेसिस सेंटर अशा अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

शस्त्रक्रियांसाठी शुल्क-

मुंबईत पाळीव श्वानांची संख्या मोठी आहे. महालक्ष्मी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात श्वान, मांजरांवर मोफत उपचार होणार आहेत. मात्र, मोठी शस्त्रक्रिया, सीटीस्कॅन, एमआरआय यासाठी पैसे आकारण्यात येणार असल्याचे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले. 

Web Title: in mumbai new animal hospital in mahalakshmi will be in service till the end of june 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.