मुंबई : वाशी खाडी पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. सायन पनवेल मार्गावर वाशी खाडी पुलावर उभारण्यात येत असलेल्या नवीन उड्डाणपुलांपैकी वाशी बाजूकडील उड्डाणपुलाची सर्व कामे पूर्ण झाली असून हा उड्डाणपूल ऑगस्टमध्ये वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीची मोठी समस्या दूर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सायन पनवेल मार्गावर मानखुर्दहून नवी मुंबईला जोडणारा वाशी खाडीवर सहा पदरी पूल आहे. हा नवीन पूल १९९४ मध्ये वाहतुकीला सुरू करण्यात आला होता; मात्र या रस्त्यावरील वाहतूक गेल्या काही वर्षांत वाढल्यामुळे आता हा पूल अपुरा पडतो आहे. परिणामी वाशी टोल नाका भागात वाहनांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. ही वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने सध्याच्या पुलाच्या दोन्ही बाजूला समांतर असे प्रत्येकी तीन मार्गिकांचे आणखी दोन पूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) उभारण्यात येत आहेत. यातील मानखुर्दहून वाशीकडे जाण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या पुलाची कामे पूर्णत्वास गेली आहेत.
वाशी-मानखुर्द पूल डिसेंबरपर्यंत?
१) वाशीकडून मानखुर्दच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र पुलाची उभारणी केली जात आहे. या पुलाचे सद्य:स्थितीत जवळपास ६० टक्के काम पूर्ण झाले आहे.
२) पुलाची उर्वरित कामे जलदगतीने पूर्ण करून ही मार्गिका डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.
असा असेल नवीन पूल-
१) पुलांची लांबी- १,८३७ मीटर
२) नवी मुंबईकडील पोहोचमार्ग- ९३० मीटर
३) मुंबईकडील पोहोचमार्ग- ३८० मीटर
४) प्रकल्पासाठी खर्च : ५५९ कोटी रुपये
५) पूल : प्रत्येकी तीन मार्गिकांचे दोन पूल
६) पथकर नाके : दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी प्रत्येकी १० पथकर नाके