Join us  

‘बाणगंगा’ गाळमुक्तीसाठी लवकरच नवीन कंत्राटदार; अंदाजे एक कोटीहून अधिक खर्च 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 10:26 AM

ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसराच्या विकासासाठी मुंबई महापालिकेच्या ‘डी’ प्रभागाने अनेक कामे हाती घेतली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसराच्या विकासासाठी मुंबई महापालिकेच्या ‘डी’ प्रभागाने अनेक कामे हाती घेतली आहेत. या पार्श्वभूमीवर तलावाचे पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरणाची कामे तीन टप्प्यांत करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून तलावातील गाळ काढण्यासाठी कंत्राटदार नेमण्याकरिता नव्याने निविदा प्रक्रिया सुरू केली असून, त्यासाठी एक कोटी १९ लाख रुपयांपर्यंत खर्च येणार आहे.

बाणगंगा  परिसराच्या सौंदर्यीकरणाच्या कामादरम्यान यापूर्वी तलावातील गाळ काढण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराकडून पायऱ्यांची नासधूस झाली. त्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी तेथील कामांची पाहणी केली. यावेळी बाणगंगा परिसर आणि तेथील मंदिरे यांच्याशी संबंधित कामे करताना तेथील पावित्र्य, त्या ठिकाणांचे ऐतिहासिक महत्त्व जपले जाणे अपेक्षित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे पुरातत्त्व विभागाशी समन्वय साधत येत्या काही दिवसांत बाणगंगा परिसरातील उर्वरित कामे नियोजित वेळेत पूर्ण करावी. शिवाय उर्वरित गाळ काढण्याची कामे यापुढे हस्तचलित यंत्रणेच्या पद्धतीने करावे, असेही गगराणी यांनी सूचित केले. त्यामुळे आधीचे कंत्राट रद्द करून गाळ काढण्यासाठी पालिकेने नव्याने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

... म्हणून गाळात

१)  तलाव परिसरात अस्थी विसर्जन व पितृपक्षात धार्मिक विधी केले जातात. निर्माल्य, पिंड आणि इतर साहित्य थेट तलावात टाकले जात असल्याने पाणी दूषित होऊन त्याचा गाळ तळाशी साचतो. तसेच अस्वच्छता पसरते. 

२)  तलावाच्या पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेत हा गाळ काढण्याचा प्रयत्न पालिका करत असून, आयुक्तांच्या सूचनेप्रमाणे आता नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे.

‘रोबो’ करणार सफाई-

बाणगंगा तलावातील सफाई करण्यासाठी एका छोट्या रोबोटिक मशिन ‘जेलीफिश’चा वापर करण्याचा निर्णय महापालिकेच्या ‘डी’ प्रभागाने घेतला आहे. त्यासाठी एका कंत्राटदार कंपनीकडून या मशिनची बाणगंगा तलावात मागील आठवड्यात चाचणी करण्यात आली. आणखी एक चाचणी पार पडल्यानंतर त्याच्या वापराबाबत अंतिम निर्णय होणार आहे. सुरुवातीला एकच यंत्र घेण्याचे नियोजन महापालिकेच्या ‘डी’ प्रभागाने केले आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिका