घाटकोपरचा नवा थाट; रेल्वे स्टेशनचा मेकओव्हर, प्रवाशांच्या गर्दीवर उतारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 09:39 AM2024-07-29T09:39:22+5:302024-07-29T09:42:03+5:30
घाटकोपर रेल्वे स्थानकाला वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर ही मेट्रो वन जोडली गेली आहे.
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या ‘मेकओव्हर’चे काम मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडून हाती घेण्यात आले असून, आतापर्यंत या रेल्वे स्थानकांतील सरकत्या जिन्यांसह, पादचारी पूल, तिकीट काऊंटर आणि छताच्या कामाचा बऱ्यापैकी भाग पूर्णत्वास गेला आहे. या ‘मेकओव्हर’मुळे येथील प्रवाशांना सध्या दिलासा मिळतो आहे, असा दावा रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे.
घाटकोपर रेल्वे स्थानकाला वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर ही मेट्रो वन जोडली गेली आहे. या मेट्रोने दिवसाला प्रवास करणाऱ्यांचा आकडा साडेचार लाखांच्या आसपास आहे. साहजिकच या रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेच्या प्रवाशांसह मेट्रोच्या प्रवाशांचाही ताण येतो. विशेषत: घाटकोपर पश्चिमेकडील असल्फा, कमानी, नारायण नगरसह एलबीएस पट्ट्यातील महाकाय वस्ती याच रेल्वे स्थानकावर अवलंबून आहे. घाटकोपर पूर्वेकडील पूर्व द्रुतगती मार्गाची लोकवस्तीही घाटकोपर रेल्वे स्थानकावर अवलंबून आहे.
या लोकवस्तींसह गेल्या काही दिवसांपासून घाटकोपर आणि लगतच्या परिसरातील कॉर्पोरेट ऑफिसच्या वाढत्या संख्येमुळे प्रवासी संख्येत मोठी भर पडल्याने रेल्वे स्थानकाचा हाती घेण्यात आलेला मेकओव्हर प्रवाशांना दिलासादायक ठरत आहे.
१) दोन टप्प्यांत मेक ओव्हरचे काम केले जात आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून, दुसऱ्या टप्प्यातील कामालाही हात घातला जात आहे.
२) संपूर्ण कामाची किंमत अंदाजे १८ कोटी रुपये असून, काम पूर्ण करण्याची तारीख एप्रिल २०२७ आहे. वेळेत काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
मध्य रेल्वेच्या सहकार्याने मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडून मेकओव्हरचे काम केले जात आहे. नव्या कामांमध्ये फलाट क्रमांक चारवरील सरकत्या जिन्याचा समावेश आहे. फलाट क्रमांक एकवरील पत्र्याच्या कामाचा समावेश आहे. मेट्रोच्या एफओबीवरील सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. नवीन तिकीट घर तयार झाले आहे. नवीन आरक्षण केंद्र नवीन होत आहे. आता बनविण्यात आलेल्या मोठ्या एफओबीला कनेक्टिव्हिटी देण्याचे काम केले जात आहे. पायऱ्या आणि सरकते जिने असे दोन्हीच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी दिली जात आहे. - केतन शाह, सदस्य, झेडआरयूसीसी
सरकते जिने अडगळीच्या ठिकाणी उभारण्याऐवजी गरज आहे तिथे उभारले पाहिजेत. अजूनही बरीचशी कामे अपूर्ण आहेत. ही कामे करताना रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांची सुरक्षितताही जपली गेली पाहिजे. विकासकामांनी प्रवाशांना फायदा होत असेल, तर त्याचे स्वागतच आहे. मात्र, या व्यतिरिक्त रेल्वे फेऱ्या वाढविण्यावर भर दिला पाहिजे. जेणेकरून रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी होईल आणि अपघात कमी होतील. - संदीप पटाडे, रेल्वे प्रवासी, घाटकोपर