वांद्रे पश्चिमेत नवीन तरण तलाव; प्रशासकीय इमारतीही बांधणार, २३ कोटी रुपयांचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 09:55 AM2024-07-12T09:55:33+5:302024-07-12T09:57:22+5:30
मुंबईकरांना पोहण्याचा आनंद घेता यावा, यासाठी महापालिकेने अंधेरी पूर्व व पश्चिम, विक्रोळी, वरळी, मालाड व बोरीवली येथे नवीन तरण तलाव बांधले आहेत.
मुंबई : वांद्रे पश्चिमेतील एमएटी महाविद्यालयाजवळील मैदानात २५ बाय १५ मीटर क्षेत्रफळावर मुंबई महापालिका २२ कोटी ९६ लाख ८३ हजार ६२५ रुपये खर्चून तरण तलाव बांधण्यात येणार आहे.
त्याचबरोबर तेथे तळ अधिक एक मजली प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार असून, त्यात हाॅल, प्रशिक्षकांसाठी खोली, महिला व पुरुषांसाठी कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोली तसेच शाैचालय असणार आहे. या तलावचा फायदा वांद्रे पश्चिम आणि खारमधील नागरिकांना होणार आहे.
मुंबईकरांना पोहण्याचा आनंद घेता यावा, यासाठी महापालिकेने अंधेरी पूर्व व पश्चिम, विक्रोळी, वरळी, मालाड व बोरीवली येथे नवीन तरण तलाव बांधले आहेत. मात्र, वांद्रे परिसरात खासगी तरण तलावांची संख्या कमी आहे. तसेच पालिकेचाही तरण तलाव येथे उपलब्ध नाही. त्यामुळे वांद्रे पश्चिम-खारमधील नागरिकांनी या ठिकाणी तरण तलाव बांधावा, अशी मागणी लावून धरली होती. त्याची दखल घेत पालिकेने वांद्रे पश्चिमेत तरण तलाव बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तरण तलावासह तळ अधिक एक मजली प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. या तलावाचा महिलांनाही फायदा घेता यावा, यासाठी त्यांच्याकरिता विशेष बॅच येथे चालवण्यात येणार आहे.
असा असेल तरण तलाव-
१) १५ मीटर बाय २५ मीटर
२) महिलांसाठी विशेष बॅच
३) प्रशासकीय इमारत
४) ट्रेनर, मॅनेजरसाठी रूम
५) मल्टीपर्पज हॉल
६) महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र खोली, शाैचालय
७) २२ कोटी ९६ लाख रुपये खर्च