Join us

हुंड्यासाठी मारहाण, नवविवाहितेचा झाला गर्भपात; सासरच्यांकडून प्लॉट खरेदीसाठी पैशांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 11:09 AM

हुंड्यासाठी केलेल्या मारहाणीत नवविवाहितेचा झाला गर्भपात; साकीनाक्यात सासरच्यांकडून प्लॉट खरेदीसाठी पैशांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : प्लॉट खरेदीसाठी हुंड्यामध्ये पैसे न दिल्याने केलेल्या मारहाणीत नवविवाहितेचा गर्भपात झाल्याची घटना साकीनाका येथे घडली आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

ग्रामीण भागाप्रमाणे राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही विवाहितांचा हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ वाढत आहे. गेल्या पाच महिन्यांत हुंड्यासंबंधित मुंबई पोलिसांच्या दप्तरी २०१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यापैकी १७६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

साकीनाका येथे राहणाऱ्या तरुणीचा गेल्यावर्षी स्वप्निल शिंदे याच्याशी विवाह झाला. लग्न झाल्यापासून हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी तिचा छळ सुरू केला. पतीसह सासू, सासरे, नणंद आणि दिराने तिला मारहाण केली. लग्नात हुंडा दिला नाही म्हणून प्लॉट खरेदीसाठी पाच लाखांची मागणी केली. तसेच लग्नात दिलेले दागिने स्वतःकडे ठेवण्याकरिता तगादा लावला. दागिने देण्यास नकार देताच पतीने पोटावर हाताने मारहाण केल्याने गर्भपात झाला. वडिलांनी सासरच्या मंडळींना जाब विचारताच आई-वडिलांनाही शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली. सासरच्या मंडळींनी पावणेपाच लाखांच्या दागिन्यांचा अपहार केल्याचा आरोप करत तरुणीने पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी शनिवारी गुन्हा नोंदवला आहे.

समेट घडवून आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न-

 कुटुंबातील वाद पोलिसांपर्यंत आल्यानंतर थेट कायदेशीर कारवाई करण्याऐवजी महिला अधिकारी व कर्मचारी सुरुवातीला त्यांचे पूर्ण म्हणणे ऐकून घेऊन पुढील कार्यवाही करतात. महिला कक्षाकडून अनेक प्रकरणांत समेट घडवून संसार जोडण्याचे काम करण्यात येते.

चार जणींची आत्महत्या-

१) हुंड्याच्या त्रासाला कंटाळून पाच महिन्यांत चार जणींनी आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूला सासरच्या मंडळींना जबाबदार धरण्यात आले आहे.

२) हुंड्याव्यतिरिक्त १० जणींनी आयुष्य संपविले, तर ११ जणींच्या हत्येची नोंद झाली आहे.

पाच महिन्यांत २,०८४ गुन्हे-

१) जानेवारी ते मेदरम्यान मुंबईत महिलांशी संबंधित दोन हजार ८४ गुन्हे दाखल झाले. 

२) यामध्ये हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ केल्याचे १९२ गुन्हे आहेत. 

 ३) तर, त्या व्यतिरिक्त होणाऱ्या छळाचे १८५ गुन्हे दाखल झाले आहेत. 

 ४) हुंड्याच्या त्रासाला कंटाळून चार जणींनी आयुष्य संपविले आहे. तर पाच जणींचा बळी गेला आहे.

५) गेल्यावर्षी याच पाच महिन्यांत २८९ गुन्हे दाखल झाले होते.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीहुंडा प्रतिबंधक कायदापोलिस