मलबार हिलसाठी नवीन पाण्याची टाकी नको; ‘आयआयटी रुरकी’च्या सूचनांवर तज्ज्ञांचा आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 09:52 AM2024-08-14T09:52:12+5:302024-08-14T09:55:27+5:30
मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीऐवजी त्याची दुरुस्ती करावी, अशी सूचना आयआयटी रुरकी या संस्थेने मुंबई महापालिकेला केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीऐवजी त्याची दुरुस्ती करावी, अशी सूचना आयआयटी रुरकी या संस्थेने मुंबई महापालिकेला केली आहे. शिवाय दुरुस्ती आधी पर्यायी व्यवस्था म्हणून नवीन टाकी बांधण्याची सूचनाही केली. मात्र हा जलाशय १०० वर्षांहून अधिक जुना असून, या आधीही त्याची दुरुस्ती शहरातील पाणीपुरवठ्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ न देता पार पाडल्याचे पर्यावरणतज्ज्ञांनी नमूद केले.
पालिकेच्या बाजूने निकाल यावा, याकरिता आयआयटी रुरकीच्या तज्ज्ञांना पालिकेकडून जलाशयासंदर्भात चुकीची माहिती दिल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. त्यामुळे आयआयटी रुरकीच्या अहवालावर आक्षेप घेत पालिकेने या जलाशयाच्या दुरुस्तीसाठी नवीन पर्यायी टाकी बांधण्याचा घाट घालू नये, असे पत्र अभ्यासकांनी प्रशासनाला लिहिले आहे.
मलबार हिलमधील ब्रिटिशकालीन जलाशय हे दक्षिण मुंबईतील पाण्याची गरज भागवण्यासाठी बांधलेले पहिले कृत्रिम जलाशय आहे. हे जलाशय हँगिंग गार्डनच्या पृष्ठभागाच्या अगदी खाली एका टेकडीवर आहे. त्याची क्षमता १४७.७८ दशलक्ष लीटर आहे. या जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम पालिकेकडून केले जाणार होते. त्यामुळे १९१ दशलक्ष लीटरपर्यंत पाणीपुरवठा क्षमता होणार होती.
दरम्यान, आता आयआयटी रुरकीच्या अहवालानंतर याची पुनर्बांधणी न करता केवळ दुरुस्ती केली जाणार आहे. जूनच्या सुरुवातीला रुरकीच्या तज्ज्ज्ञांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पालिकेला अहवाल दिला. त्यात मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणी करण्याऐवजी दुरुस्ती करा, पुनर्बांधणीची गरज नाही, असे म्हटले आहे.
पर्यायी व्यवस्था करण्याची सूचना-
१) त्याआधी पर्यायी व्यवस्था करण्याची सूचना आयआयटीने केली आहे. या पार्श्वभूमीवर जवळच पाण्याची नवीन टाकी बांधण्याशिवाय पर्याय नाही, असे अहवालात म्हटले आहे.
२) जलाशयाचे काम टप्प्याटप्यात करणे शक्य नसल्याने पाणीपुरवठा बंदच करावा लागणार असल्याचे त्यात नमूद केले आहे. मात्र आयआयटीच्या या अहवालावर मलबार हिल येथील स्थानिक, पर्यावरण अभ्यासक आणि तज्ज्ञांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी पालिका आयुक्तांना या संदर्भात पत्र लिहिले आहे.
आक्षेप काय आहेत?
मलबार हिल जलाशयात पाणीपुरवठ्यासाठी पाच विविध टाक्या असून, त्यांची क्षमता चुकीची सादर करण्यात आली आहे. पाण्याच्या पाच टाक्या स्वतंत्रपणे का दुरुस्त होऊ शकत नाहीत, यावर कुठेही माहिती दिलेली नाही.
आयआयटी रुरकीच्या तज्ज्ञांना पालिकेने दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे अहवालात चुकीच्या नोंदी झाल्याचे समोर आले आहे. मलबार हिल जलाशयाच्या दुरुस्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या दुसऱ्या पाणीसाठवण क्षमतेची आवश्यकता नसताना नवीन टाकी बांधण्याचा घाट घातला जात आहे. प्रशासनाने यात तत्काळ लक्ष देऊन हे रद्द करण्याची आवश्यकता आहे. - झोरू बथेना, पर्यावरण अभ्यासक