मलबार हिल जलाशयाची पुनर्बाधणी नाही, दुरुस्तीच! आयआयटी रुरकीचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 10:39 AM2024-07-09T10:39:54+5:302024-07-09T10:41:58+5:30

मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बाधणीऐवजी त्याची दुरुस्ती करावी, अशी सूचना आयआयटी रुरकीने मुंबई पालिकेला केली आहे.

in mumbai no reconstruction of malabar hill reservoir only repair report of iit roorkee | मलबार हिल जलाशयाची पुनर्बाधणी नाही, दुरुस्तीच! आयआयटी रुरकीचा अहवाल

मलबार हिल जलाशयाची पुनर्बाधणी नाही, दुरुस्तीच! आयआयटी रुरकीचा अहवाल

मुंबई : मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बाधणीऐवजी त्याची दुरुस्ती करावी, अशी सूचना आयआयटी रुरकीने मुंबई पालिकेला केली आहे. संस्थेने याबाबतचा अहवाल सादर केला आहे. पालिकेकडून याबाबतची प्रक्रिया लवकरच पार पाडली जाईल, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दुरुस्ती करण्याआधी जवळच पर्यायी नवीन मोठी पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. यामुळे मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बाधणीविरोधात लढा देणाऱ्या स्थानिकांना दिलासा मिळाला आहे.

मलबार हिलमधील ब्रिटिशकालीन जलाशय हे दक्षिण मुंबईतील पाण्याची गरज भागवण्यासाठी बांधलेले पहिले कृत्रिम जलाशय आहे. हे जलाशय हैंगिंग गार्डनच्या पृष्ठभागाच्या अगदी खाली एका टेकडीवर आहे. त्याची क्षमता १४७.७८ दशलक्ष लिटर इतकी आहे.

लवकरच पुढील प्रक्रिया पार पडणार-

१) या जलाशयाच्या पुनर्बाधणीचे काम पालिकेकडून केले जाणार होते. त्यामुळे त्याची १९१ दशलक्ष लिटरपर्यंत पाणीपुरवठा क्षमता होणार होती. दरम्यान, आयआयटी रुरकीच्या अहवालानंतर याची पुनर्बाधणी न करता केवळ दुरुस्ती केली जाणार आहे. जूनमध्ये रुरकीच्या तज्ज्ञांकडून पाहणी केल्यानंतर त्यांनी पालिकेला अहवाल सादर केला.

२) यामध्ये मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बाधणीऐवजी दुरुस्ती करा,
पुनर्बंधणीची गरज नाही, असे म्हटले, त्यानुसार लवकरच पुढील प्रक्रिया पार पडेल, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी दिली.

तीन अहवालांमधील असा आहे फरक...

१) पालिका अधिकाऱ्यांसह आयआयटी तज्ज्ञांनी सादर केलेल्या पहिल्या अहवालात जलाशयाची दुरुस्ती किंवा त्याची पुनर्बाधणी गरजेची असल्याचे सांगतानाच त्याआधी पर्यायी व्यवस्थेची सूचना केली होती. जलाशयाचे काम टप्प्याटप्प्यात करणे शक्य नाही.
यासाठी पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे. त्यामुळे जवळच पाण्याची नवी टाकी बांधण्याशिवाय पर्याय नाही, असे म्हटले आहे. दुसऱ्या अहवालात मलबार हिलमधील स्थानिकांसह तज्ज्ञांचा समावेश होता.

२) दुसऱ्या अहवालात सध्याचे जलाशय धोकादायक नाही. ते पाहून नव्याने पुनर्बाधणीची गरज नाही. जलाशय आणखी १० ते १५ वर्षे टिकू शकते, असे नमूद केले. तर आयआयटी रुरकीच्या तिसऱ्या अहवालात जलाशयाच्या पुनर्बाधणीऐवजी दुरुस्ती करा, असे म्हटले आहे.

Web Title: in mumbai no reconstruction of malabar hill reservoir only repair report of iit roorkee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.