सप्टेंबरपर्यंत पाण्याची चिंता नाही; दमदार पावसामुळे पाणीसाठा गेला १८ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 09:46 AM2024-07-09T09:46:15+5:302024-07-09T09:47:36+5:30

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

in mumbai no water worries till september relief for citizens due to heavy rains the water storage has gone up to 18 percent | सप्टेंबरपर्यंत पाण्याची चिंता नाही; दमदार पावसामुळे पाणीसाठा गेला १८ टक्क्यांवर

सप्टेंबरपर्यंत पाण्याची चिंता नाही; दमदार पावसामुळे पाणीसाठा गेला १८ टक्क्यांवर

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईच्या पाणीसाठ्यात सलग दुसऱ्या दिवशी एका दिवसात ४ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांतील पाणीसाठा सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत १८ टक्क्यांवर पोहोचला. मागील वर्षीपेक्षा उपलब्ध पाणीसाठा हा ३ टक्क्यांनी कमी असला तरी मुंबईकरांसाठी ही समाधानकारक बाब आहे. मागील वर्षी ८ जुलैला मुंबईचा उपलब्ध पाणीसाठा २१.५७ टक्के इतका होता. मात्र, आता पुरेशा पाणीसाठ्यामुळे मुंबईकरांची सप्टेंबरपर्यंतची पाणी चिंता मिटली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांत ८ टक्के पाणीसाठा शिल्लक असताना मुंबई आणिपरिसरात पालिकेकडून पाणी कपात लागू करण्यात आली आहे. ही पाणी कपात ३० मेपासून ५ टक्के तर ५ जूनपासून १० टक्के इतकी करण्यात आली होती. समाधानकारक पाऊस होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, आता मुंबईचा जलसाठा १८ टक्क्यांवर आल्यावर पालिका प्रशासन पाणी कपातीचा निर्णय मागे घेणार का, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागून आहे.

अतिरिक्त साठ्याचा वापर थांबविला-

राज्य सरकारकडून भातसा धरणातून १,३७,००० दशलक्ष लिटर तर अप्पर वैतरणा धरणातून ९१,१३० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळतो. मुंबईच्या पाणीसाठ्यात घट झाल्यानंतरच या अतिरिक्त साठ्याचा वापर पालिका प्रशासनाकडून केला जातो. मात्र, मागील काही दिवसांतील जलाशय क्षेत्रात झालेल्या पावसाने पाणीसाठ्यात वाढ झाली. या पार्श्वभूमीवर हा अतिरिक्त साठ्याचा वापर पालिकेकडून थांबविण्यात आला आहे.

१८% टक्क्यांवर सात जलाशयांतील पाणीसाठा सोमवारी सकाळी पोहोचला. समाधानकारक पाऊस होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा झाली आहे.

Web Title: in mumbai no water worries till september relief for citizens due to heavy rains the water storage has gone up to 18 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.