लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : केंद्र शासनाच्या ध्वनिप्रदूषण नियमाला पोलिसांच्या साक्षीने गणेशोत्सवात तिलांजली दिली जात असल्याचा आरोप जागरूक नागरिकांनी केला आहे. गणेशोत्सवाच्या काळात लाऊडस्पीकर, वाद्ये व फटाक्यांनी आवाजाची आणि निर्बंधांची मर्यादा ओलांडल्याने ध्वनिप्रदूषण वाढले असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आहे.
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरात ध्वनिक्षेपक यंत्रणांसह वाद्यांचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे. रात्री-अपरात्री फटाके फोडले जात आहेत. शहरात गल्लीबोळापासून प्रमुख ठिकाणे, विसर्जन मार्ग आदींवर आवाजाने मर्यादा ओलांडण्याचा उच्चांक गाठला आहे. शहरात तब्बल ९३ शांतता क्षेत्रे व १५ रहिवासी क्षेत्रे असून या एकाही क्षेत्रात ध्वनिप्रदूषण नियंत्रण नियमांचे पालन केले जात नाही.
मध्यंतरी भोंग्यांवरून-
पोलिसांनी ध्वनिप्रदूषण कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी व ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी अपर पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती नेमली होती. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याचे प्रभारी यांना ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी जबाबदार प्राधिकृत अधिकारी नेमले आहे.
लोकांची उडाली झोप-
१) आवाजाची पातळी रात्री १० वाजेपर्यंत शांतता व रहिवासी क्षेत्रात ५० ते ५५ डेसिबल व रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत ४० ते ४५ डेसिबल आवाज ठेवणे बंधनकारक आहे.
२) आवाजाची पातळी मर्यादेनुसार राखली जात नसून उशिरापर्यंत आवाज चढलेला असल्याने असंख्य सर्वसामान्य नागरिकांची झोप उडाली आहे.
३) विशेषतः वृद्ध, लहान मुले, रुग्ण, गर्भवती मातांना आवाजाचा त्रास आरोग्याला घातक ठरू शकतो. मोठ्या आवाजामुळे लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत. विद्यार्थ्यांना आवाजामुळे अभ्यास करणे अवघड होते.
ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करताना पोलीस दिसत नाहीत. मंडळांना ध्वनिक्षेपकाच्या परवानग्या देताना ध्वनिप्रदूषण रोखण्याबाबत अटी-शर्ती आणि आवाजाच्या मर्यादेचा तक्ता पोलिस देतात. कारवाईचे इशारे देतात, मात्र हे सर्व कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार आहे. ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांसह त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करावी. - हर्षद ढगे, अध्यक्ष, फॉर फ्युचर इंडिया