भूषण पाटील यांच्या ‘हाता’ला मागाठाणे, मालाडकरांची साथ; मनसेची मते गेली कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 10:51 AM2024-06-10T10:51:47+5:302024-06-10T10:53:27+5:30

मुंबई उत्तर मतदारसंघात जाेरदार चर्चा.

in mumbai north lok sabha election result 2024 marathi and muslim majority in malad and magathane increasing the percentage of votes of congress bhushan patil | भूषण पाटील यांच्या ‘हाता’ला मागाठाणे, मालाडकरांची साथ; मनसेची मते गेली कुठे?

भूषण पाटील यांच्या ‘हाता’ला मागाठाणे, मालाडकरांची साथ; मनसेची मते गेली कुठे?

मुंबई : मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे भूषण पाटील यांची मतांची टक्केवारी वाढविण्यात मराठीबहुल मागाठाणे आणि मुस्लीमबहुल मालाड या विधानसभा मतदारसंघांचा हातभार लागल्याचे दिसून येत आहे. हे मतदारसंघ अनुक्रमे शिदेंसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे आणि काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांच्याकडे आहेत. दरम्यान, मनसेच्या साथीचा कितपत फायदा झाला यावरही चर्चा सुरू आहे.  

नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली तरी विद्यमान आमदार  आपली तिकीट पेरणीच या निमित्ताने करत होते. खासकरून महायुतीत तिकीट वाटपावरून सुरू असलेली रस्सीखेच पाहता सुर्वे यांनी मागाठाण्यात आपली ताकद मतांच्या गणितावरून दिसून येईल, याकरिता जोर लावला होता. मात्र, गेल्या लोकसभेच्या तुलनेत याच मतदारसंघातून भाजपचे उमेदवार पीयूष गोयल यांची मते कमी (६,९६५) झाल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी काँग्रेसला येथे सुमारे १९ हजार मते जादा मिळाली.  मागाठाण्यापाठोपाठ दहिसरमधून भाजपची सहा हजार ८०४ मते कमी झाली. तर, काँग्रेसच्या मतांमध्ये १० हजार ३६८ इतकी वाढ झाली.  कांदिवली पूर्व, चारकोपमधून भाजपला तितकासा धक्का बसलेला नाही. चारकोपमधून काँग्रेसला ११ हजार १४८ मते अधिकची मिळाली आहेत.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत  मुंबई उत्तरमधील सहा विधानसभांपैकी मनसेने दहिसर, मागाठाणे, कांदिवली पूर्व या तीन विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती. 

मागाठाण्यात मनसेचे नयन कदम दुसऱ्या क्रमांकावर होते. अवघ्या तीन मतदारसंघांत मिळून मनसेला ६८ हजार २४४ मते मिळाली होती. परंतु, प्रत्येक विधानसभेत घटलेली मते पाहता महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेच्या या मतांचा फायदा भाजपला झाल्याचे दिसून येत नाही.

…तर गोयल यांना झुंजवले असते

मुंबई उत्तर भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला आहे. मात्र, तरीही या मतदारसंघाच्या बाबतीत महाआघाडीची गणिते चुकल्याची चर्चा आहे. हा मतदारसंघ आघाडीपैकी कुणालाच नको होता. मात्र, उद्धवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर येथे निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. त्यांनी दहिसरपाठोपाठ मराठीबहुल भागात बैठका, भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली होती. आयत्यावेळी हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला. या ठिकाणी सेनेकडून घोसाळकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले गेले असते तर त्यांनी गोयल यांना निश्चितपणे झुंजवले असते.

१) बोरीवली या सुनील राणे यांच्या मतदारसंघातून साडेपाच हजारांच्या आसपास मते कमी झाली असली तरी काँग्रेसची १२ हजार २८१ मते वाढली आहेत. 

२) भाजप-शिंदेसेना आमदारांची “कमी झालेली मते शिवसेनेची असल्याचे गृहीत धरले तरी त्या तुलनेत काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ झाली आहे. 

Web Title: in mumbai north lok sabha election result 2024 marathi and muslim majority in malad and magathane increasing the percentage of votes of congress bhushan patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.